शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन ४८ फेऱ्या सुरू
By Admin | Updated: July 2, 2014 00:07 IST2014-07-02T00:06:36+5:302014-07-02T00:07:56+5:30
रत्नागिरी विभाग : मागेल त्याला एस. टी. सेवा...

शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन ४८ फेऱ्या सुरू
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे रत्नागिरी विभागांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एस. टी.च्या ४८ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय ‘मागेल त्याला बस’ याप्रमाणे ज्या शाळांकडून किंवा प्रवाशांकडून शाळेसाठी बसफेरीची मागणी करण्यात येईल, त्याठिकाणी तत्काळ बसफेरी सुरू करण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली.
शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घरापासून जास्त अंतर असेल, त्यांच्यासाठी शालेय फेरी सुरू करण्यात येते. शाळांकडून तसेच प्रवाशांकडून शाळेच्या वेळेत स्वतंत्र गाडीची मागणी करण्यात येते. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे मागण्यांची दखल घेऊन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील काही शाळांसाठी येणारे विद्यार्थी अन्य प्रभागातून येतात. त्यांना बसस्थानकापासून शाळेचे अंतर लांब पडते. परिणामी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. शिवाय संबंधित विद्यार्थ्यांना रिक्षा वाहतूक तसेच मोटार वाहतूक खर्च परवडत नसल्यामुळे पास सवलत असलेली एस. टी. वाहतूक सोयीची ठरते.
जिल्ह्यात पासधारक ५२ हजार विद्यार्थी असून, त्यांना स्मार्टकार्डचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास देण्यात येतो. खासगी वाहतुकीपेक्षा एस. टी. पास दर कमी असल्याने विद्यार्थ्यांचा किंबहुना पालकांचा ओढा एस. टी.कडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)