शिवाजीनगर येथील पाखाडी कामाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: August 7, 2014 00:13 IST2014-08-06T21:27:09+5:302014-08-07T00:13:33+5:30
चिपळूण पालिका : संदीप मोरे आणि कुटुंबीयांचा उपोषणाचा इशारा

शिवाजीनगर येथील पाखाडी कामाकडे दुर्लक्ष
चिपळूण : शहरातील शिवाजीनगर परिसरातील पाखाडीचे काम करण्याकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने येथील रहिवासी संदीप मोरे व कुटुंबीयांनी १५ आॅगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत मोरे यांनी यापूर्वी लोकशाही दिनात दि. २७ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी पाहणी करुन संबंधित तक्रारदारास बोलावण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. पाखाडीचे काम २ दिवसांत चालू करावे, अशी सूचना देण्यात आली. हे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून लेखी अहवाल कार्यालयाकडे कळविण्यात यावा, असेही सांगण्यात आले होते. मात्र, २६ जानेवारीपर्यंत हे काम न झाल्याने मोरे हे उपोषणास बसले होते. यावेळी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राचे वाचन केले व तुमचे काम दि. १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले. मात्र, हे काम अजूनही स्थितीत आहे. नगर परिषदेतील बांधकाम अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्याकडे यासंदर्भात वारंवार विचारणा केली असता काम लवकरच चालू करुन देतो. दोन दिवस थांबा. उद्या येतो, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य पद्धतीने मार्ग काढून ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत.
या ठिकाणी अतिक्रमण वाढले असून, पाखाडीचे काम न झाल्यामुळे येथील रहिवाशांना अन्य सुविधा मिळू शकत नाहीत. एखादी व्यक्ती मृत झाल्यास मृतदेह उचलून नेण्यासही अडचण होत आहे. अग्निशमन बंब व रुग्णवाहिकाही या भागात येऊ शकत नाहीत.
याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास मोरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याला संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही म्हटले आहे. (वार्ताहर)