एनडीए सरकारची भांडाफोड करणार : अनंत गाडगीळ
By Admin | Updated: September 21, 2014 00:50 IST2014-09-21T00:50:11+5:302014-09-21T00:50:11+5:30
समविचारी पक्षाशी आघाडी करणार

एनडीए सरकारची भांडाफोड करणार : अनंत गाडगीळ
रत्नागिरी : एन. डी. ए. सरकार न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप, घटनात्मक पदांची अवहेलना, प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत लोकशाहीच्या सर्व स्तंभांना धक्का देणारे सरकार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पॅनेल प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली.
विधानसभा निवडणुका लक्षात घेता गेल्या पाच वर्षात राज्यात केलेले भरीव काम लोकांपर्यत पुस्तिका व संवादाद्वारे मांडली जाणार आहे. निवडणुकीपूर्वी भाजप, एनडीएकडून जनतेला दिलेली आश्वासने व सद्यस्थिती असलेली घूमजावची भूमिका लोकांसमोर मांडणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
पारदर्शकतेचा बडेजाव करणाऱ्या पंतप्रधानांनी गेल्या तीन परदेश दौऱ्यात एकाही पत्रकाराला सोबत नेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या भाषणात युपीएने गेल्या दहा वर्षात देशाची वाट लावली असल्याचे मोदी सातत्याने म्हणत असत. परंतु भूतानला नुकतीच मोदी यांनी भेट दिली असता भारताने गेल्या दहा वर्षात नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले. एनडीए नेते महागाईला काँग्रेसला जबाबदार धरतात मात्र सरकार केंद्रात येताच रेल्वे भाड्यात एकदम १४ टक्के वाढ केली, तसेच तेलाच्या किमंतीत वाढ केल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
दहशतवाद्यांच्या हल्लयासाठी युपीए ला जबाबदार धरणाऱ्या एनडीए ने १७ लाख खर्चून झालेल्या मोदींच्या शपथविधीस नवाज शरीफ यांना लाल गालिचा अंथरला, एवढे होवूनही बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी गप्प राहतात, याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला बी.ए.आर.सी ला भेट देतात तेव्हा ‘अणूऊर्जा हीच एकमेव उर्जा’, म्हणतात तेव्हा जैतापूरच्या प्रश्नावर रान उठवू म्हणणारे शांत का ? असा सवालही गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.(प्रतिनिधी)