कदमांमुळे राष्ट्रवादी अडचणींच्या फेऱ्यात
By Admin | Updated: June 30, 2014 00:18 IST2014-06-30T00:13:29+5:302014-06-30T00:18:45+5:30
विधानसभा निवडणूक : चार जागा खेचण्याचे आव्हान

कदमांमुळे राष्ट्रवादी अडचणींच्या फेऱ्यात
चिपळूण : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे पक्षत्याग करुन अजूनही बाहेर असल्याने जिल्ह्यातील विधानसभेच्या चार जागा अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या चार जागा आपल्याकडे खेचण्याचे आव्हान नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणात उलथापालथ होत आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्याची राजकीय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वरिष्ठ पातळीवर बदल केले आहेत.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवून त्याजागी कोकणचे नेते सुनील तटकरे यांची नियुक्ती केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पडझड काही प्रमाणात थांबेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांत असणारी नाराजी दूर करण्याचे काम प्राधान्याने करावे लागणार आहे.
तसेच पक्ष सोडून गेलेल्यांची समजूत काढून त्यांना सन्मानाने पक्षात आणणे हे प्रदेशाध्यक्ष तटकरेंसमोर महत्त्वाचे काम आहे.
काही महिन्यांपूर्वी पक्ष सोडलेले कदम हे पक्षाबाहेरच असल्याने त्यांचे व्यक्तीगत आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. कदम यांच्याबाबत पक्षाने निवडणुकीपूर्वी स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून गांभिर्याने विचार केला नाही, तर रत्नागिरी, गुहागर, चिपळूण व दापोली या विधानसभेच्या चार जागा पक्षाच्या हातून जाण्याची शक्यता अधिक आहे. दोन महिन्यांपूर्वी रायगडमधून खासदारकी लढविलेल्या कदम यांनी कोणाचेही पाठबळ नसताना गुहागरमधून १२००० मते घेतली आहेत.
माजी आमदार कदम गेली ४० वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. जिल्ह्यात त्यांचे व्यक्तीगत संबंध आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी मजबूत केली. परंतु, कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. ते जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत तोपर्यंत काम न करण्याची घोषणा करुन कदम यांनी पक्षत्याग केला होता. तटकरे व कदम यांचे मित्रत्त्वाचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणती तडजोड होईल, हे येणारा काळच ठरवेल. परंतु, कदम यांना दूर ठेवणे आज तरी राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नाही. (प्रतिनिधी)