जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा
By Admin | Updated: July 3, 2016 23:45 IST2016-07-03T23:45:55+5:302016-07-03T23:45:55+5:30
भास्कर जाधव : चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरातून ललकारी

जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा
चिपळूण : आपला कोणत्याही वादाशी संबंध नाही. आपले कोणाशीही भांडण नाही. झाले गेले विसरुन आजपासून सर्व मतभेदांना तिलांजली देऊया. चिपळूण हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. येथील नगर परिषद, पंचायत समितीबरोबरच जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा. आपल्याला आता विरोधकांचे पार्सल उचलायचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करु या व सर्व निवडणुका जिंकूया, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रभारी, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केले.
चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे शिबिर शनिवारी माटे सभागृहात झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आमदार संजय कदम, प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव, प्रदेश विद्यार्थी उपाध्यक्ष विक्रांत जाधव, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, युवक अध्यक्ष राजू आंब्रे, जिल्हा उपाध्यक्ष शौकत मुकादम, पद्माकर आरेकर, विष्णुपंत सावर्डेकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहिते, डॉ. सेलचे डॉ. संतोष दाभोळकर, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चिपळूण तालुकाध्यक्ष खताते यांनी प्रास्ताविक केले. आमदार जाधव म्हणाले की, रमेश कदम व माझे काय भांडण आहे? काहीही नाही. पक्षात आल्यानंतर २००६मध्ये आपण स्वत:हून सर्वांनी एकत्र यावे म्हणून मेळावा घेतला. परंतु, त्या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी मेळावा घेतला. त्या मेळाव्यात लोक काय वाटेल ते बोलले. मी उत्तर दिले नाही. त्यामुळे वेळोवेळी मला काढून टाकण्यापर्यंत ठराव करण्यात आले. मी काही बोललो नाही. मला माहीत आहे की माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांचे राजकारण चालत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. (प्रतिनिधी)
हा जिल्हाध्यक्षांचा अपमान : श्रीकृष्ण खेडेकर
शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांनी भाषणात नगरसेवक इनायत मुकादम यांना येथे येण्यास लाज वाटली पाहिजे. हा जिल्हाध्यक्षांचा अपमान होत असेल तर योग्य नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही, असे मुकादम यांच्याकडे पाहून म्हटले. त्यावेळी वातावरण चांगलेच तापले. इनायत मुकादम, फैय्याज देसाई व अन्य दोन ते तीन कार्यकर्त्यांनी उठून खेडेकर यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. मुकादम व्यासपीठाच्या दिशेने गेले. यावेळी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी त्यांना थांबण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर प्रभारी भास्कर जाधव यांनी त्यांना गप्प बसविले. यावेळी गदारोळ होतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, नशिबाने थोडक्यात आटोपले.