बांदरी विभागाला नवसंजीवनी?

By Admin | Updated: January 15, 2016 00:47 IST2016-01-14T21:54:00+5:302016-01-15T00:47:42+5:30

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : महाळुंगे येथे जलोपासना अभियान

Navsanjivani to the Bandra division? | बांदरी विभागाला नवसंजीवनी?

बांदरी विभागाला नवसंजीवनी?

खेड : अठरा गाव बांदरी विभागातील महाळुंगे गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ जानेवारीला भेट देणार आहेत. येथील जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खेड येथील एमबीए महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कदम यांच्या स्वत:च्या मालकीच्या ६ एकर जागेत उभारण्यात आलेल्या फार्म हाऊसमध्ये ग्रामीण पर्यटन सुरू करण्याच्या कामालाही त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार आहे.
खेड तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या महाळुंगेसारख्या गावात बहुउद्देशीय योजनांचा प्रथमच प्रारंभ मुख्यमंत्री यांच्याहस्ते होत आहे. हा मार्ग असलेल्या अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ४० गावांतील पर्यटन आणि कृषी विकासाला यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा त्यामुळे महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस १७ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता महाळुंगे येथे उपस्थित राहणार आहेत. गावातील केदारनाथ मंदिराजवळ यावेळी खास जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानासह आंबवली महाळुंगे ग्रामीण पर्यटन कार्याला त्यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने या कोकण जलपरिक्रमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली.
जलपरिक्रमा आणि जलचेतना परिषदेमुळे येथील अठरा गाव बांदरी विभागासह तालुक्यातील कृषी आणि पर्यटन क्षेत्रही विकसित होणार आहे. या भागातील डोंगराळ भागात असलेल्या धनगरवाड्यांसह डोंगरातील अनेक गावांना वारंवार भासणारी पाणीटंचाई तसेच नदीकिनारी पारंपरिक पध्दतीने करीत असलेल्या शेतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने या जलचेतना परिषदेचा आणि जलपरिक्रमा योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे. तसेच त्यामुळे रोजगारासह सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला हातभार लागणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री अनंत गीते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते आणि प्रमुख मार्गदर्शक राजेंद्रसिंह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. (प्रतिनिधी)


पर्यटनाची माहिती : १९९५ नंतर मुख्यमंत्री ग्रामीण भागात
१९९५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या कामांसाठी भेटी दिल्या होत्या़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९५नंतर तालुक्यातील ग्रामीण भागाला भेट देणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. ग्रामीण भागाच्या पर्यटन विभागाची माहिती यानिमित्त घराघरात पोहोचणार आहे़


पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशातच कोकण हा जलसमृध्द भाग आहे. तरीही कोकणात भीषण पाणीटंचाई जाणवते. याच पार्श्वभूमीवर पाण्याचे नियोजन केल्यास कोकणातील गावागावामध्ये जलसमृध्दी येऊ शकते.

Web Title: Navsanjivani to the Bandra division?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.