आडिवरे येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

By Admin | Updated: October 13, 2015 00:17 IST2015-10-12T21:30:09+5:302015-10-13T00:17:31+5:30

राजापूर तालुका : जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर; नऊ दिवस मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप

Navaratri festival preparations in Adivare | आडिवरे येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

आडिवरे येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

जैतापूर : नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थानतर्फे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची महती सर्वदूर पोहचल्याने तिच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. जिल्ह्यात आडिवरे येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. नऊ दिवस या परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. कोल्हापूर, सांगली, सातारा, गोवा याठिकाणचे भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीची महती सर्वदूर पोहचल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नवरात्रीनिमित्त मंदिरात साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. यानिमित्त पहिल्या दिवसापासून दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पूजापाठ, अभिषेक व महानैवेद्य, दुपारी ३ वाजता आरती, दुपारी ३.३० ते ५.३० ह. भ. प. विलास शहाणे (नाटे) यांचे कीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता धुपारती, त्यानंतर प्रवचनकार किरण जोशी (रत्नागिरी) यांचे प्रवचन, रात्री ९ वाजता अरविंद पिळगावकर (मुंबई) यांचे गायन, रात्री १० वाजता पालखी प्रदक्षिणा होईल.
या कार्यक्रमांबरोबरच १३ रोजी रात्री १२ नंतर कीर्तन, १४ रोजी रत्नागिरी येथील ‘उत्सव कलागुणांचा’ हा कार्यक्रम, गुरुवारी ‘घरटे तुझे नी माझे’ हे कोंभे येथील कलाकारांनी सादर केलेले नाटक, १६ रोजी कोल्हापुरातील ‘झंकार’ हा आॅर्केस्ट्रा, १७ रोजी कशेळी येथील कलाकारांचे ‘व्यंकोजी वाघ’ हे नाटक, १८ रोजी कालिकावाडी येथील कलाकारांचे ‘देवा घरचा न्याय’ हे नाटक सादर होणार आहे.
१९ रोजी गावडेआंबेरे येथील कलाकार ‘रंग उमलत्या मनाचे’ हे नाटक सादर करतील. २० रोजी रसिकराज, वाडापेठचे ‘कुणी तरी आहे’ हे नाटक तर २१ रोजी मांडेश्वर उत्साही नमन मंडळ, नवेदर यांचे नमन होईल. या कार्यकमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाकाली मंदिर ट्रस्ट, आडिवरेचे अध्यक्ष विश्वनाथ शेट्ये यांनी केले आहे.
आडिवरे येथे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी रत्नागिरी एस. टी. डेपो, देवगड एस. टी. डेपो आणि राजापूर एस. टी. डेपो येथून जरूरीप्रमाणे जादा गाड्या सोडल्या जातात. जैतापूरच्या नवीन पुलामुळे मालवण, देवगड आणि विजयदुर्ग कडील यात्रेकरूंची सोय झाली आहे. आडिवरे येणाऱ्या भक्तांनी गाड्या पार्किंग करणे, देवी दर्शन घेणे, मौजमौजा करणे आणि स्वच्छता याबाबत योग्य तो संयम व शिस्त पाळावी आणि देवस्थान, स्वयंसेवक आणि पोलीस यांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

राजापूर तालुक्यातील आडिवरे हे ठिकाण प्रति कोल्हापूर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिर परिसरात श्रीदेवी महाकाली, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी महासरस्वती, श्रीदेव रवळनाथ आणि श्री नगरेश्वर अशी विविध देवतांची मंदिर आहेत. त्यामुळे पंचायतन मंदिर म्हणूनही या परिसराची ओळख निर्माण झाली आहे. श्रीदेवी महाकालीच्या मंदिराची नव्याने बांधकाम केले असून, यावर्षी याठिकाणी भक्तांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Navaratri festival preparations in Adivare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.