राष्ट्रवादी-सेनेतच कडवी झुंज
By Admin | Updated: October 6, 2015 23:45 IST2015-10-06T21:52:23+5:302015-10-06T23:45:57+5:30
चार पक्ष निवडणुकीत उतरणार

राष्ट्रवादी-सेनेतच कडवी झुंज
रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागांची पोटनिवडणूक जशी जवळ येत आहे तसे वातावरण तापत चालले आहे. येत्या १ नोव्हेंबरला होणाऱ्या या पोटनिवडणूकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व मनसे हे चार पक्ष आखाड्यात उतरले आहेत. मात्र राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातच कडवी लढत होणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.रत्नागिरी पालिकेच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत सेना-भाजपची युती होती. सेनेला सर्वाधिक १३ तर भाजपला ८ जागांवर विजय मिळाला होता. २१ जागांवर निर्विवाद विजय मिळाल्याने युती पालिकेत सत्तेवर आली. राष्ट्रवादीला ६ तर कॉँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. मात्र, युतीचा हा संसार फार काळ टिकला नाही. वर्षभरापूर्वी विधानसभेच्या तोंडावर राज्यातील सेना-भाजप युती तुुटली अन पालिकेतील युतीची सत्तेची घडीही विस्कटली.
पाच वर्षांच्या सत्तेत अडीच वर्ष नगराध्यक्षपद दोन्ही पक्षांकडे राहणार असल्याचे ठरले होते. मात्र, त्यातील सव्वा वर्षाचा काळच सेनेला नगराध्यक्षपद मिळाले. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून पालिकेतील सेना-भाजपमध्ये नगराध्यक्षपदावरून शीतयुध्द सुरू आहे. पोटनिवडणूकीच्या निमित्ताने आखाडा मोकळा झाला आहे. भाजपा व सेना याच मुद्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यात मनसेही स्वबळावर निवडणूक लढवत आहे. मात्र शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत परतलेल्या उमेश शेट्येंनी सेनेपुढे पोटनिवडणूकीत मोठे आव्हान निर्माण ्रेकेले आहे. त्यामुळे शिवसेनाही कडवेपणाने उमेश शेट्ये यांना या निवडणूकीत पराभूत करण्यासाठी व त्यांचे राजकीय मनसुबे उधळण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)
२०१६ ची
लिटमस टेस्ट?
रत्नागिरी हा मतदारसंघ वर्षभरापूर्वी प्रथमच शिवसेनेला मिळाला. राष्ट्रवादीतून सेनेत जाऊन या जागेवर उदय सामंत विजयी झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक त्यांच्याच मतदारसंघात होत असून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान सामंत यांच्यापुढेही आहे. २०१६ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणूकीसाठी ही पोटनिवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आहे. त्यामुळे सामंत, शेट्ये यांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.
रत्नागिरी पालिका
पोटनिवडणूक कार्यक्रम
एकूण जागा-४
प्रभाग २ व ४- प्रत्येकी दोन जागा
नामनिर्देशन स्वीकारणे-१ ते ८ आॅक्टो.
छाननी- ९ आॅक्टोबर २०१५
माघार-१९ आॅक्टोबर २०१५
मतदान केंद्र यादी-२६ आॅक्टोबर.
मतदान- १ नोव्हेंबर २०१५.
मतमोजणी व निकाल-२ नोव्हेंबर.
राजपत्रात निकाल प्रसिध्दी-६ नोव्हेंबर