राष्ट्रवादी उत्साही; काँग्रेस निरुत्साही
By Admin | Updated: July 3, 2014 00:35 IST2014-07-03T00:33:54+5:302014-07-03T00:35:25+5:30
दापोली मतदारसंघ : तालुकाध्यक्षांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी उत्साही; काँग्रेस निरुत्साही
दापोली : राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर जाधव यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून कॅबिनेट मंत्रीपद दिल्यामुळे कोकणातील राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून, दापोली विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास मेहता यांनी गटतटाच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला असून, काँग्रेस पक्षात निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दापोली तालुका एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. परंतु राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर काँग्रेसची वाताहत झाली. काँग्रेस पक्षातील बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल झाले. काँग्रेस पक्षाची ताकद दोन पक्षात विभागली गेल्याने काँग्रेसचा पराभव झाला. या मतदारसंघात पंचवीस वर्षांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला व शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी निवडून गेले.
गेली २५ वर्षे या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारावर मात करत आहेत. तेव्हापासून काँग्रेस पक्षाला एकेकाळचा बालेकिल्ला परत मिळवता आला नाही. त्यातच काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेल्याने आता दापोली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा म्हणून राष्ट्रवादीचे पदाधिकारी वारंवार वरिष्ठांकडे मागणी करु लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई व जिल्हा परिषदेचे गटनेते संजय कदम यांचे रुपाने विधानसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावागावात विकासकामे पोचवली. तत्कालीन पालकमंत्री भास्कर जाधव, आताचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनचा निधी दापोली विधानसभा क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रवादीचे संजय कदम यांनीही खेड-मंडणगड या दोन तालुक्यांत विकासकामाचा सपाटा लावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गावागावात विकासकामे केली जात असताना पक्षातीलच गटबाजीने काँग्रेस पक्ष रसातळाला जाऊ लागला आहे. विधानसभेची निवडणूक लढवू शकेल, असा चेहराही काँग्रेसकडे नाही. त्यामुळे दापोली मतदारसंघ राष्ट्रवादीला घेऊन त्या बदल्यात महाडची जागा काँग्रेसला सोडण्याची हालचाल वरिष्ठ पातळीवरुन दोन्ही पक्षांमध्ये सुरु असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)