मॅरेथॉनबरोबर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अपेक्षाची घोडदौड-
By Admin | Updated: January 16, 2016 00:33 IST2016-01-15T23:12:46+5:302016-01-16T00:33:21+5:30
-यश रत्नकन्यांचे -जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकणाऱ्या रत्नकन्यांच्या यशाची मालिका

मॅरेथॉनबरोबर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अपेक्षाची घोडदौड-
मेहरून नाकाडे -- रत्नागिरी मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक टिकविण्याबरोबर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतातील सामनावीर खेळाडू म्हणून अपेक्षा सुतार हिला सन्मान प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तिने सहा सुवर्ण, तर राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके प्राप्त केली. राष्ट्रीय स्पर्धेत दोन, तर राज्यस्तरीय स्पर्धेत ४ रौप्यपदके मिळवली. राष्ट्रीय स्पर्धेत एक कांस्यपदकही संपादन केले आहे. इयत्ता दहावीत असूनही तिने खेळह सुरू ठेवला आहे.
अपेक्षा पाचवीपासून खो-खो स्पर्धेत शालेय गटात सहभागी झाली. तेव्हापासून तिने प्रत्येक स्पर्धेत एकतरी बक्षीस मिळवायचेच, असा जणू चंगच तिने बांधला आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली आहे. १७ वर्षे वयोगटातील दोन राष्ट्रीय स्पर्धा खेळून तिने दोन्ही स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवले आहे. या गटात उत्कृष्ट खेळ केल्यामुळे भारतीय संघातील उत्कृष्ट सामनावीराचा किताब देऊन तिला सन्मानित करण्यात आले. १४ वर्षे वयोगटातील दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अपेक्षाने दोन सुवर्णपदके मिळवली. शिवाय पायका राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक मिळवले. महिला राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक मिळवले.
राज्यस्तरीय स्पर्धेत चार रौप्यपदके मिळवली आहेत. खो-खो स्पर्धेबरोबर विविध मॅरेथॉन स्पर्धेतही अपेक्षा सहभागी होत असून, प्रत्येक स्पर्धेत तिने पहिला क्रमांक पटकावला आहे. देवरूख, चिपळूण, खेड, गणपतीपुळे, तसेच रोटरॅक्ट, रत्नागिरी स्पर्धेत अपेक्षाने तिच्या गटात पहिला क्रमांक मिळवला आहे.
आई-बाबा व लहान भाऊ असलेल्या अपेक्षाला स्पर्धेसाठी घरातून भरपूर प्रोत्साहन मिळत आहे. शाळेचे क्रीडाशिक्षक विनोद मयेकर यांचे तसेच पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे अपेक्षा हिने सांगितले. गुजरात, इचलकरंजी, कर्नाटक, नाशिक, पंजाब, पुणे (बालेवाडी), औरंगाबाद, उस्मानाबाद, नागपूर, ठाणे, पुणे, सांगली, मुंबई येथील विविध स्पर्धांमध्येही अपेक्षाने सहभाग घेतला होता.अपेक्षा सध्या दहावीमध्ये शिकत आहे. शाळेत सध्या पूर्वपरीक्षा सुरू असली तरी पेपरचा अभ्यास करूनही न चुकता सायंकाळी सरावाला मैदानावर उपस्थित असते.
अपेक्षाने मिळविलेले यश
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात २ सुवर्णपदक.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात २ सुवर्णपदक.
पायका राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक.
महिला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक.
ग्रामीण राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक.
राष्ट्रीय स्पर्धेत दोन रौप्यपदके.
राज्यस्तरीय स्पर्धेत ४ रौप्यपदके.
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात भारतीय संघाचा उत्कृष्ट सामनावीर.