मंडणगड तालुक्यातील राष्ट्रीय, राज्य मार्ग खड्ड्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:18+5:302021-08-22T04:34:18+5:30
खड्ड्यांमध्ये पावासाचे पाणी साचून अपघात वाढ. लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : तालुक्यातील आंबडवे-लोणंद या राष्ट्रीय महामार्गासह मंडणगड - खेड ...

मंडणगड तालुक्यातील राष्ट्रीय, राज्य मार्ग खड्ड्यातच
खड्ड्यांमध्ये पावासाचे पाणी साचून अपघात वाढ.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : तालुक्यातील आंबडवे-लोणंद या राष्ट्रीय महामार्गासह मंडणगड - खेड राज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढतच चालले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी धाेकादायक बनला असून, हे राष्ट्रीय महामार्ग आहेत की, ग्रामीण रस्ते असाच प्रश्न आता पडू लागला आहे. काही दिवसांपूर्वी नूतनीकरण वा दुरुस्ती केलेल्या या रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त हाेत आहे. गणेशाेत्सवापूर्वी तरी हे रस्ते सुस्थितीत हाेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील आंबडवे ते महाड तालुक्यातील राजेवाडीपर्यंतचा मार्ग हा आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत कॉंक्रिटीकरणाकरिता मंजूर असून, विविध कारणांनी या मार्गाचे काम मागील दोन वर्षे रखडले आहे. मात्र, कॉंक्रिटीकरणाच्या या लालफितीच्या कारभारात अस्तित्वात असलेल्या डांबरी मार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीनंतर तुळशी घाट, म्हाप्रळ-चिंचाळी मार्गावर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, पण दोनच महिन्यांत रस्त्याची नासधूस झाली. यामुळे जुलै महिन्यात अनेक दुचाकीस्वार गाडी घसरून पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या तालुक्यातील अनेक मार्गांवर हीच स्थिती आहे. केळवत ते दुधेरे मार्गावरील रस्त्यात मोठे खड्डे पडले असून, या मार्गावरील खड्डे बुजवण्याची कामे दोनवेळा झाली. मात्र, रस्त्यातील खड्डे ही समस्या कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्याची गैरसोय होऊ नये याकरिता घाईगडबडीत केलेली कामे तालुकावासीयांच्या समस्यांमध्ये भर टाकत आहे. त्यामुळे एककीडे सार्वजनिक निधीचा अपव्यय झालेला असल्याने कामाचे ठेकेदाराची देयके रस्ता पूर्ववत करत नाही, तोपर्यंत अदा न करण्याची मागणी होत आहे.