नाटे पोलीस ठाण्याचे आता ई-बीट पेट्रोलिंग
By Admin | Updated: October 25, 2015 23:32 IST2015-10-25T22:52:46+5:302015-10-25T23:32:48+5:30
जिल्ह्यात पहिलाच उपक्रम : पोलीस यंत्रणेवर जिल्हास्तरावरून नजर

नाटे पोलीस ठाण्याचे आता ई-बीट पेट्रोलिंग
सचिन नारकर- जैतापूर -सागरी ग्रामीण पोलीस ठाणे, नाटेच्याअंतर्गत येणाऱ्या प्रमुख गावांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस’ बसवण्यात आले आहेत. दहशतवादी, अतिरेकी, अनोळखी व्यक्ती यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने ‘ई बीट पेट्रोलिंग’ ही संकल्पना अमलात आणली आहे. त्याचा पहिला प्रयोग रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी सागरी ग्रामीण पोलीस ठाण्याकरिता केला आहे.
पोलीस कर्मचारी त्या - त्या गावात ठरल्याप्रमाणे पेट्रोलिंग करतात की नाही, हे या डिवाईसमुळे कळणार आहे. डिवाईसच्या भीतीने का होईना, प्रत्येक गावात पोलीस कर्मचारी आपल्या वाहनासह जात असल्याने त्या गावात पोलीस येणार म्हणून सर्व काही सुरळीत होत आहे. नाटे पोलीस ठाण्याचे कर्मचारी आपली सेवा व्यवस्थित बजावत आहेत.
ई - डिवाईस कशेळी, वेत्ये, साखरीनाटे, मुसाकाझी, आंबोळगड, धाऊलवल्ली तर बंदर जैतापूर, माडबन, तुळसुंदे, धानिवरे, अणसुरे, कात्रादेवी, सागवे, काताळी या भागात बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी दिवसातून दोनवेळा पेट्रोलिंग केले जाते. याची पूर्ण नोंद संगणकावर झाल्यावर त्याची माहिती जिल्हास्तरावर कळविण्यात येते.
नाटे, साखरीनाटे भागामध्ये डिवाईस बसवताना नाटे पोलिसांना ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला होता. अणुऊर्जेसंदर्भात काहीतरी यंत्र बसवत असल्याचा ग्रामस्थांचा समज झाल्याने ग्रामस्थांनी इतरत्र कुठेही हे यंत्र बसवता कामा नये, अशी भूमिका घेतली. या डिवाईसबाबत नाटे पोलिसांनी डेमोसुद्धा दाखवला होता. तरीदेखील विरोध झाल्याने अखेर ग्रामपंचायतीच्या भिंतीवर तबकडीसारखा गोल असणारे हे डिवाईस बसविण्यात आले.
डिवाईस २ इंच व्यासाचे, काळ्या रंगाचे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक पाच सेंटीमीटर जाडीचे आहे. ते एका स्क्रूद्वारे भिंतीवर पाच फूट उंचीवर बसवण्यात आले असून, त्याच्याशी संबंधित असणारे दुसरे यंत्र टी. व्ही. रिमोटप्रमाणे आहे. त्याच्या मागच्या बाजूला सेन्सर आहे. या डिवाईसच्या समोर नेले असता तो डिटेक्टर आपले काम सुरु करतो व त्याप्रमाणे तारीख, वेळ याची नोंद होते. ही नोंद संगणकात होऊन मग थेट जिल्हास्तरावर पाठवण्यात येते.
४कशेळी, वेत्ये, साखरीनाटे, मुसाकाझी, आंबोळगड, धाऊलवल्ली तर बंदर जैतापूर, माडबन, तुळसुंदे, धानिवरे, अणसुरे, कात्रादेवी, सागवे, काताळी या भागात ई-डिवाईस.
४दिवसातून दोनवेळा होते पेट्रोलिंग.
४डिवाईसला ग्रामस्थांनी सुरुवातीला केला विरोध.
४डिवाईसवरील नोंद जिल्हास्तरावर पाठवण्यात येते.
४पोलीस अधीक्षकांचा उपक्रम.