नारायण राणे : जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्याना मार्गदर्शन

By Admin | Updated: August 9, 2014 00:35 IST2014-08-08T22:46:09+5:302014-08-09T00:35:14+5:30

लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आत्मचिंतन करा

Narayan Rane: Workers' guidance in the meeting of the District Congress | नारायण राणे : जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्याना मार्गदर्शन

नारायण राणे : जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्याना मार्गदर्शन


कणकवली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत आत्मचिंतन करा. सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभेच्या जागांवर काँग्रेस आघाडीचा विजय व्हावा यासाठी मरगळ झटकून कामाला लागा, असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्याना केले. येथील स्वामी विवेकानंद सभागृहात राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, प्रांतिक सदस्य नीतेश राणे, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, उपाध्यक्ष संदेश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, वसंत केसरकर, विकास सावंत, अशोक सावंत, दत्ता सामंत, डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, आपल्या पक्षाचा खासदार, आमदार नसेल किंवा सत्ता नसेल तर तुम्हाला ठेके कसे मिळतील? तुमच्या रुबाबाचा विचार करा. लोक वाईट मते व्यक्त करायला प्रवृत्त होतील असे काम करु नका. काळजी घ्या.
कुडाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेची महत्त्वाची पदे दिली. या तालुक्याला सर्वात जास्त निधी दिला. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्य मिळू शकले नाही.
सर्वात वाईट परिस्थिती या तालुक्यात दिसून आली. त्यामुळे यापुढे तरी विचार करा. जे स्वार्थासाठी इतर पक्षात गेले त्यांचा विचार करु नका. शिवसेना, भाजप लोकोपयोगी कामे करीत असताना तुम्ही शांतच बसला आहात.
गेल्या ४८ वर्षांच्या काळात अनेक विरोधक आले आणि गेले. मात्र, मी वाढतच गेलो. ते संपत गेले. त्यामुळे विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देवू नका. यापुढे जोमाने कामाला लागा, असे आवाहनही मंत्री राणे यांनी यावेळी केले. नीतेश राणे यांच्यासह अन्य उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)

...तर त्यांचे राजीनामे घ्या
जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच जनतेशी जवळिक वाढेल. ज्या पदाधिकाऱ्यांना काम करायचे नसेल त्यांच्याशी जिल्हाध्यक्षानी बोलून त्यांच्या पदाचे राजीनामे घ्यावेत. त्यांना इतर ठिकाणी सामावून घेता येईल. तसेच पक्ष कार्य करु इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना या पदांवर संधी देता येईल.

Web Title: Narayan Rane: Workers' guidance in the meeting of the District Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.