कबड्डी स्पर्धेत नम्रता प्रतिष्ठान विजयी
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T22:33:54+5:302014-11-11T23:17:56+5:30
जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात चिपळूणच्या न्यू हिंद विजय संघावर १ गुणाने मात

कबड्डी स्पर्धेत नम्रता प्रतिष्ठान विजयी
चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ कालभैरव देवस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात चिपळूणच्या न्यू हिंद विजय संघावर १ गुणाने मात करुन मंडणगडचा नम्रता प्रतिष्ठान हा संघ विजेता ठरला. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कुलभूषण कुलकर्णी याला गौरविण्यात आले. अंतिम सामना चिपळूणचा न्यू हिंद विजय व मंडणगडचा नम्रता प्रतिष्ठान यांच्यामध्ये झाला. मध्यंतरापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात न्यू हिंद विजय ६ गुणांनी आघाडीवर होता. मात्र, ही आघाडी न्यू हिंद विजय संघाला शेवटपर्यंत टिकविता आली नाही. राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या कुलभूषण कुलकर्णी, चंद्रकांत घाणेकर, शेखर तटकरे यांनी अनुभवाच्या जोरावर न्यू हिंद विजय संघावर बाजी पलटवली. कुलभूषणने एका चढाईत ३ खेळाडू बाद करून न्यू हिंद विजयवर एक लोन चढविण्याची भूमिका बजावली. त्यानंतर शेवटच्या ५ मिनिटात रंगतदार सामना झाला. अखेर थरारक लढतीत नम्रता प्रतिष्ठानने एक गुणाने सामना जिंकला. सौरभ नाटुस्कर याने उत्कृष्ट पकड करीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दोन्हीही लढती एकतर्फी झाल्या. यामध्ये नम्रता प्रतिष्ठानने आंतरराष्ट्रीय खेळाडू शैलेश सावंतच्या खेळावर गजानन संघाचा ३२-१९ असा पराभव केला. न्यू हिंद विजयने दसपटी क्रीडा मंडळाचा ३१-१५ गुणांनी पराभव केला. या सामन्यात अभिषेक भोजनेने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन घडविले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुलभूषण कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट चढाई म्हणून अभिषेक भोजने, तर सर्वोत्कृष्ट पकड म्हणून सौरभ नाटुस्कर यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील बक्षीस वितरण जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कदम, राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य रवींद्र देसाई, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बाबू तांबे, प्रताप शिंदे, नगरसेवक सुचय रेडीज, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शिवसेना विभागप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक राजेश कदम, उत्तम जैन, माजी नगरसेवक विजय चितळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले यांच्या उपस्थितीत झाले. (वार्ताहर)
संघर्ष क्रीडा मंडळाने ३३व्या वर्षात पदार्पण केले असून, या मंडळाने मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भरविण्याचा मान मिळविला असून, त्या यशस्वीही केल्या आहेत. मंडळातर्फे व्यायामशाळा बांधण्याचा संकल्प असून, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार रमेश कदम यांनी केले.