खोट्या दस्तऐवजाने गोठा केला नावावर
By Admin | Updated: July 14, 2015 21:46 IST2015-07-14T21:46:35+5:302015-07-14T21:46:35+5:30
अंकुश सावंत : पंचायत समितीकडून कार्यवाही होत नसल्याने उपोषणाचा इशारा

खोट्या दस्तऐवजाने गोठा केला नावावर
गुहागर : तालुक्यातील जामसूद येथील जयवंत सावंत यांनी खोटे दस्तऐवज सादर करुन घर नावावर करणे, जमीन मालकांची परवानगी न घेता ग्रामपंचायतीमध्ये मालमत्तेवर नाव लावून अनधिकृतपणे गोठा बांधून तो नावावर केला आहे. याप्रकरणी संबंधित सर्व स्तरावर तक्रार करुनही पंचायत समितीकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने तक्रारदार अंकुश रामचंद्र सावंत यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
जामसूद येथील या घराला २००१-०२ पर्यंत रामचंद्र विठ्ठल सावंत यांचे नाव होते. ते मृत झाल्यानंतर त्यांचे भाऊ वसंत विठ्ठल सावंत यांचे नाव कोणाच्याही परवानगीशिवाय लावण्यात आले. वसंत सावंत मृत झाल्यानंतर २०१२ पासून त्यांचा मुलगा जयवंत सावंत यांचे नाव लागले आहे. याबाबत रामचंद्र सावंत यांचे मुलगे अंकुश, बबन, बळवंत व सुहास यांनी आपली कोणतेही संमती न घेता नावे कशी लागली, याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
यावेळी माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीला दिलेल्या संमतीपत्रात खोट्या सह्या करुन परवानगी मिळवल्याचे उघड झाले. यावरुन गुहागर पोलीस ठाण्याकडून संबंधितावर गुहागर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन ग्रामसेवक पोपट गोविंद पोळ यांना सहआरोपी करण्यात आले. हा विषय न्यायप्रविष्ट असला तरी यानंतरच्या काळात जयवंत सावंत यांनी कोणाचीही संमती न घेता गोठ्यांचे बांधकाम केले आहे. याचा वेगळा खातेउतारा ग्रामपंचायतीने दिला. ग्रामपंचायत नोंद नसताना व कोणतीही कागदपत्र नसताना मालमत्ता उताऱ्यावर नावे चढवण्यात आली. हा गोठा अनधिकृत असल्याने याबाबत पूर्ण चौकशी करुन कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार अर्ज दिला होता.
हा अर्ज दिल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत तसेच तहसीलदार यांना याबाबत चौकशी करण्याचे पत्र आले. मात्र, पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तीनवेळा पत्रव्यवहार करुनही कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने अखेर अंकुश रामचंद्र सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती व तहसीलदार यांना बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)