चिपळूण : सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकपेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता असून, खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल ५ पथके तैनात केली आहेत. त्यापैकी एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले असून, अन्य ४ पथके मारेकऱ्यांच्या मागावर आहेत. मारेकऱ्यांनी वर्षा जोशी यांच्या संगणकातील हार्डडिस्क काढून नेली असल्याने पूर्ण नियोजन करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या धामणवणे खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (६३) यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार घटना उघडकीस येण्यापूर्वी सुमारे १० ते १२ तास अगोदर त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच बुधवारी रात्रीच वर्षा जोशी यांचा खून करण्यात आला असल्याचा अंदाज आहे.त्यांच्या शरीरावर काही मोजकेच कपडे असले, तरी कोणताही अतिप्रसंग झालेला नाही. त्यांच्या शरीरावर असलेल्या किरकोळ जखमा या प्रतिकार व झटापटीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच श्वास कोंडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे.नातेवाइकांकडे चौकशीपोलिसांनी ज्या संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्याची चौकशी पूर्ण करून त्याला सोडून देण्यात आलेले आहे. त्यानंतर शुक्रवारी वर्षा जोशी यांच्या नातेवाइकांनाही चौकशीसाठी बोलावून घेतले होते.चार पथके मारेकऱ्यांच्या मागावरअतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी चिपळूणमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली असून, एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले आहे, तर अन्य ४ पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्या माध्यमातून देखील काही संशयित हालचाली हाती लागण्याची शक्यता आहे.खुनाचे कारण गुलदस्त्यातचखून नेमका कोणत्या कारणास्तव झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मयत वर्षा जोशी या एकट्याच घरात राहत होत्या. त्यामुळे घरातून कोणते आणि किती साहित्य व दागिने चोरीला गेले किंवा कसे हे स्पष्ट होणे अवघड आहे. त्यामुळे खुनामागचे नेमके कारण अजूनही पुढे आलेले नाही. संशयित ताब्यात आल्यानंतरच त्याचा उलगडा होणार आहे.
पर्यटनची भरपूर आवडवर्षा जोशी यांचा पुनर्विवाह झाला होता, तोही आंतरजातीय पद्धतीचा होता. मात्र २०११ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले व त्यांना मुलं नसल्याने त्या तब्बल १५ वर्षे एकट्याच जीवन व्यतीत होत्या. या कालावधीत पर्यटनानिमित्त त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केला. देशभरात अनेक ठिकाणी तसेच सिंगापूर व अन्य काही देशातही त्या जाऊन आल्या होत्या. आता हैदराबाद पीठापूर येथे जाऊन आल्यानंतरही त्यांनी सिंगापूरच्या टूरचे नियोजन केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.
तीन प्रकारे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नया घटनेत मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा तीन प्रकारे प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. येथील सीसीटीव्हीचा मुख्य डीव्हीआर गायब आहे. तसेच वर्षा जोशी यांचा मोबाइल पाण्याने भरलेल्या बादलीत फेकून देण्यात आला होता आणि आता त्यांच्या संगणकाची हार्डडिस्कही गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी रेकी करून पूर्ण नियोजनाअंती हा खून करण्यात आला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेजपोलिसांना स्थानिक भागातील काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. त्यातील काही हालचाली लक्षात घेता एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशा निष्कर्षापर्यंत पोलिस आले आहेत. येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचे मुख्य धागेदोरे उघड होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.