झाड अंगावर पडून मायलेकराचा मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2014 00:35 IST2014-06-15T00:32:05+5:302014-06-15T00:35:36+5:30
कुरतडे येथील दुर्घटना

झाड अंगावर पडून मायलेकराचा मृत्यू
रत्नागिरी : कुरतडे-कातळवाडी येथे फणसाचे झाड अंगावर कोसळल्याने माय-लेकराचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज, शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
मनाली चंद्रकांत गिजबिले (वय ४०, उमरे चांदेराई) आणि राज चंद्रकांत गिजबिले (८) अशी मृतांची नावे आहेत. मनाली गिजबिले या राजला घेऊन कुरतडे कातळवाडी येथील आपल्या मामाकडे माहेरी आल्या होत्या. त्या आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गावातीलच पऱ्यावर कपडे धुण्यासाठी मुलासह गेल्या होत्या. कपडे धुऊन परतत असताना अचानक फणसाचे झाड उन्मळून कोसळले. दुर्दैवाने हे झाड त्या माय-लेकराच्या अंगावर कोसळले.
ही घटना समजताच गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडाखालून दोघांनाही गावकऱ्यांनी बाहेर काढले. मात्र, त्यामध्ये मनाली यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर राज गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी राजला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. या माय-लेकराच्या आकस्मिक निधनाने कुरतडे, उमरे चांदेराई परिसरावर शोककळा पसरली आहे. (शहर वार्ताहर)