मुरूडमध्ये समुद्राचे अतिक्रमण
By Admin | Updated: July 17, 2016 01:05 IST2016-07-16T21:19:31+5:302016-07-17T01:05:48+5:30
दापोली तालुका : नारळ - पोफळीच्या बागेत पाणी शिरून नुकसान

मुरूडमध्ये समुद्राचे अतिक्रमण
दापोली : दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर गेल्या ३ वर्षांपासून समुद्राच्या उधाणाचे पाणी येत असून, येथील ग्रामस्थांच्या नारळ-पोफळीच्या बागांमध्ये हे पाणी येऊन नुकसान होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, ढिम्म महसूल विभागाकडून या नुकसानाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मुरूड समुद्रकिनाऱ्यावर गेल्या तीन वर्षांपासून वरची पाखाडी, खालची पाखाडी आणि मुरूड बीच येथे असलेल्या नारळ-पोफळीच्या बागांमध्ये समुद्राच्या लाटा अतिक्रमण करत आहेत. समुद्राचे पाणी थेट बागांमध्ये येत असल्याने बागेबाहेरील सुरूची झाडे, माड कोलमडून जमीनदोस्त होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊनही या निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. तालुक्यातील पाळंदे, कर्दे, आंजर्ले येथे समुद्रकिनारी बंधारा उभारण्यात आला आहे. मात्र, गेल्या ३ वर्षांपासून समुद्राच्या अतिक्रमणाचा सामना करणाऱ्या मुरूड समुद्रकिनाऱ्यावर बंधारा उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी येथील बागायतदार ग्रामस्थांचे प्रत्येकवर्षी माड उन्मळून पडत असून, आर्थिक फटका बसत आहे. महसूल विभागाकडून या नुकसानाचा पंचनामा करण्यातदेखील चालढकल करण्यात येत आहे. महसूल विभाग बंदर विभागाकडे आणि बंदर विभाग महसूल विभागाकडे बोट दाखवत असल्याने नुकसान होऊनही ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे. मुरूड समुद्रकिनाऱ्यावर तातडीने बंधाऱ्याची उभारणी करून होणारे नुकसान टाळता येणे शक्य होणार आहे. यामुळे तातडीने येथे बंधारा उभारण्याची मागणी बागायतदार व ग्रामस्थ प्रबोध जोशी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
तीन वर्षे समस्या : महसूलचे दुर्लक्ष
गेल्या तीन वर्षापासून या भागात समुद्राच्या पाण्याचे अतिक्रमण होत असून, समुद्रकिनाऱ्यावरील बागांचे नुकसान होत आहे. या नुकसानाची नोंद होतच नसल्याने या ग्रामस्थांना नुकसान भरपाईदेखील मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना नुकसान सहन करावे लागत आहे.