वाढीव पदावरील महिला शिक्षकांनी केले मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST2021-09-18T04:33:37+5:302021-09-18T04:33:37+5:30
रत्नागिरी : कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव प्रस्तावित पदांवरील महिला शिक्षिकांनी आपल्या पदाच्या मान्यतेसाठी पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमाेर मुंडन आंदोलन ...

वाढीव पदावरील महिला शिक्षकांनी केले मुंडन आंदोलन
रत्नागिरी : कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव प्रस्तावित पदांवरील महिला शिक्षिकांनी आपल्या पदाच्या मान्यतेसाठी पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमाेर मुंडन आंदोलन केले. राज्यातील जवळजवळ १२९८ प्रस्तावित पदांवरील शिक्षक आपल्या वेतनाच्या हक्कापासून दहा ते बारा वर्षे वंचित आहेत. त्यामुळे वाढीव पदावरील महिला शिक्षकांनी प्रलंबित असणाऱ्या वेतनाच्या न्याय्य हक्कासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंडन आंदोलन व भीक मागो आंदोलन केले.
राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील विनावेतन शिक्षक २ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन करीत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा आंदोलने केली आहेत. या शिक्षकांनी स्वातंत्र्यदिनीही वाढीव पदांच्या मान्यतेसाठी आत्मक्लेश आंदोलन केले होते, तसेच अनेकदा आझाद मैदान मुंबई, पुणे शिक्षण संचालक कार्यालय, तसेच विविध उपसंचालक कार्यालयासमोरही आंदोलने केली आहेत; परंतु आजपर्यंत या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही.
वारंवार माहिती मागविणे, प्राप्त माहितीमध्ये त्रुटी काढणे व मान्यता व वेतन न देणे या सगळ्या प्रकारामुळे विनावेतन काम करणारे शिक्षक मेटाकुटीस आले असून, आर्थिकस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. परिणामी सदर वाढीव प्रस्तावित पदांच्या बाबतीत अन्यायग्रस्त शिक्षकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत विनावेतन काम करणारे पीडित शिक्षक शिक्षण संचालक, पुणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. वाढीव पदावरील शिक्षकांचे हे आंदोलन वाढीव पदांची माहिती अचूक व परिपूर्णरीत्या त्वरित शासनाकडे पाठवावी. व शासनाने वाढीव पदांना वेतनासह त्वरित मंजुरी द्यावी, या प्रमुख दोन मागण्यांसाठी सुरू आहे.
-------------------------
भिकेची रक्कम साहाय्यता निधीसाठी
शिक्षकांच्या भीक मांगो आंदोलनातील जमा झालेली भीक मुख्यमंत्री साहाय्यता निधीला पाठविणार आहेत. जर या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही, तर यामधील काही शिक्षक मंत्रालयासमोर आत्मदहन करतील, असा इशारा शिक्षकांनी दिला आहे. हे शिक्षक वेतनाभावी त्रासले असून, त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामध्ये मरण्यापेक्षा आत्मदहन करून मेलेले बरे असा विचार पीडित शिक्षकांनी व्यक्त केला आहे.