गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:22+5:302021-08-14T04:37:22+5:30
खासदार विनायक राऊत यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण मानला ...

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करावा
खासदार विनायक राऊत यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण मानला जातो. या उत्सवासाठी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गावाला येतात. मात्र, अतिवृष्टी आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे सध्या या महामार्गाची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशाेक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी आपल्या मागणीचे एक लेखी पत्रही त्यांना दिले. या पत्रात म्हटले आहे की, गणेशोत्सव जवळ आला असून, हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपल्या गावी स्वत: च्या वाहनाने किंवा एस. टी. बसेस आणि खासगी वाहनांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने येत असतात. परंतु, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाला नियुक्त केलेल्या ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या पनवेल ते वाकेड-लांजापर्यंतचा महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. फक्त वाकेड ते सिंधुदुर्ग - झारापपर्यंतचे चौपदरीकरणाचे काम हे ९५ टक्के पूर्ण झाले आहे तरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते वाकेडपर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि आम्हा लोकप्रतिनिधींची एक संयुक्त बैठक प्रत्यक्ष तातडीने घ्यावी व रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असे या निवेदनात म्हटले आहे.