नाटळमध्ये गाळाने कोंडलेली नदी झाली मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:22+5:302021-08-22T04:34:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये नदी पुनर्जीवन मोहिमेचे काम अतिशय उल्लेखनीय झाले आहे. सिंधुदुर्गातील ...

नाटळमध्ये गाळाने कोंडलेली नदी झाली मुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये नदी पुनर्जीवन मोहिमेचे काम अतिशय उल्लेखनीय झाले आहे. सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील नाटळ येथील ग्रामस्थांच्या एकीतून अनेक वर्षांपासून गाळाने कोंडलेली नदी नाम फाउंडेशन आणि नाटळ ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून मुक्त झाली आहे. नदीची खोली वाढविल्याने यंदा पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले तरीही सर्वांचीच शेती सुरक्षित राहिली, ही मोठी उपलब्धी या पाणी चळवळीची आहे.
दोन-अडीच वर्षांपूर्वी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत आणि मंडळाचे पदाधिकारी सर्वेक्षण केले असता त्यांना नदी दगडामुळे होरली असल्याचे निदर्शनास आले. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने अनेकांच्या शेतीत पाणी जाऊन मोठेच नुकसान होत असे. पाऊस कितीही पडला तरी पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाणीटंचाईचा सामना दरवर्षीच करावा लागत असे. २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात आलेल्या पुराने गावाचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे भविष्यात असं घडण्याआधीच उपाययोजना करायला हवी, या जाणिवेतून मुंबईकर चाकरमानी आणि गावकरी एकत्र आले. यासाठी मुंबईत बैठका झाल्या. नदी पुनर्जीवन करण्याचा निर्धार झाला. मुंबईतील रामेश्वर माऊली ग्रामस्थांच्या पुढाकाराने कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या उपस्थितीत त्यांच्याच कार्यालयात बैठका झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नामचे जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांचे नाव पुढे आले. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांचे मित्र राजू परुळेकर यांनीही नाम फाउंडेशनचे नाव सुचवले आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक असलेल्या नाना पाटेकर यांचा नंबरही दिला. या व्हाॅट्सॲप नंबरवर सावंत यांनी केवळ मेसेज पाठवताच तासाभरात मुंबईचे राजीव सावंत आणि पुण्याचे अभियंता गणेश थोरात यांनी संपर्क केला.अखेर नदी पुनर्जीवन करण्याच्या मोहिमेला नाम फाउंडेशनची साथ मिळाली. मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लघु पाटबंधारे आणि जिल्हाधिकारी यांच्यासह आवश्यक ती परवानगी मिळविली. नामने ३ पोकलेन मशीन देऊ केल्या.
अखेर २१ एप्रिल २०१९ रोजी प्रत्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते नदीचे पुनर्जीवन आणि खोलीकरण कामाचे उद्घाटन झाले. नाना पाटेकर गावात आल्याने गावकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या श्रमदानाने अगदी १६ - १६ तास काम सुरू झाले. सुमारे २० ते २५ लाखांचा निधी नाटळच्या मुंबईकर आणि इथल्या गावकऱ्यांनी उभा केला आणि सुमारे सव्वा महिना भारल्यासारखे काम करत ही जलक्रांती केली. या पावसाळ्यात नदीला पाणी प्रचंड प्रमाणात आले होते; मात्र ग्रामस्थांच्या कामामुळे शेतात पाणी शिरले नाही.
जलपुरुषाचा पदस्पर्श...
१७ ऑगस्ट २०१८ नाटळ गावासाठी सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा होता. जलपुरुष, रँमन मेगसेसे पुरस्कार, स्टॉक होम वॉटर प्राईझ पुरस्कारप्राप्त डॉ.राजेंद्र सिंह यांनी नाटळ गावात नदी पाहणीसाठी भेट देऊन पाहणी केली होती. त्या प्रेरणेतूनच पुढे नाटळ ग्रामस्थ तसेच मुंबईस्थित चाकरमानी यांच्या सहभागाने झालेले नदी पुनर्जीवनाचे काम केवळ गाव पातळीवरच नव्हे तर तालुका आणि जिल्हा पातळीवर चर्चेत आले.
पाणी अडवा...पाणी जिरवा मंत्र
पावसाळ्यात नदीतील गाळ व दगड गोठे वापरून प्लास्टिक कागद आच्छादून तब्बल १५ बंधारे नाटळ ग्रामस्थांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून बांधले आहेत. त्यामुळे नदीतून वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे. परिणामी, विहिरींंचे पाणी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे पाणी टंचाईवरही या ग्रामस्थांनी मात केली.