मुसळ्याचा धबधबा अद्याप दुर्लक्षित

By Admin | Updated: December 9, 2014 23:16 IST2014-12-09T21:53:39+5:302014-12-09T23:16:49+5:30

राजकीय अनास्था : पर्यटन विकासाला पोषक वातावरण असूनही दुर्लक्ष...

Mud waterfall is still ignored | मुसळ्याचा धबधबा अद्याप दुर्लक्षित

मुसळ्याचा धबधबा अद्याप दुर्लक्षित

पाचल : कोकणात येणाऱ्या पर्यटकांना खुणावतोय काजिर्डा गावचा मुसळ्याचा धबधबा. मात्र, सोयीसुविधांच्या अभावामुळे या पर्यटनस्थळाचा विकास होऊ शकला नाही. राजकीय अनास्थेमुळे या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळाला फटका बसला आहे. सह्याद्रीच्या कुशीत नयनरम्य शांत वातावरणात सतत ओसंडून वाहणारा मुसळ्याचा धबधबा दुर्लक्षित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजापूर तालुक्याच्या जामदा खोऱ्यात काजिर्डे गावी वाहात असलेला हा धबधबा काजिर्डा गावाला लाभलेली नैसर्गिक देणगीच आहे. मात्र, या आणि अशा नैसर्गिक देणग्यांकडे कुणीही लक्ष देत नसल्याने रोजगाराचे साधन उपलब्ध असतानासुद्धा सर्वच स्तरावरील अनास्थेमुळे उपलब्ध होऊ शकत नाही.
दाट हिरवळवगळता याच परिसरात पडीक जमीन मोठ्या प्रमाणात पडून आहे. मात्र, या पडीक जमिनीचा उपभोग होतानाही दिसत नाही. सपाट जमिनीवर थोड्या फार प्रमाणात उसाची तसेच भाजीपाल्याची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. धबधब्याच्या पायथ्याकडचा भाग शेकडो हेक्टर ओलिताखाली व लागवडीखाली येऊ शकतो. दुर्गम भागात असणाऱ्या काजिर्डा गावच्या ग्रामस्थांना खरे तर कृषी खात्याने मार्गदर्शन केल्यास त्यांची आर्थिक उन्नत्ती होऊ शकते. कृषी खात्याने संबंधित योजनेपासून शेतकऱ्यांना दूरच ठेवले आहे.
जामदा प्रकल्पाचा लाभ क्षेत्राच्या बाहेर शेकडो एकर जमीन पडीक राहिल्याने भविष्यात या जमिनीवर शासकीय प्रकल्पाचे नियोजन न झाल्यास ही शेकडो एकर जमीन जमीनमाफियांच्या घशात जायला वेळ लागणार नाही. कारण जामदा व अर्जुना प्रकल्प घोषित झाल्यापासून या परिसरात ज्यांची नावे आजवर कधी कानावर आली नाहीत, अशांची नावे सध्या ऐकायला मिळत आहेत. पर्यटनाला वाव असणाऱ्या धबधब्याच्या जोडीला भविष्यात होणारे जामदा धरण म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम जडणघडणीचा अनोखा संगम आहे, त्याचा विकास व्हावा, हीच जनतेची अपेक्षा आहे. (वार्ताहर)

Web Title: Mud waterfall is still ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.