महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 9, 2014 23:30 IST2014-07-09T23:30:54+5:302014-07-09T23:30:54+5:30
मागण्या प्रलंबित : शासकीय कार्यालये झाली सामसूम...

महसूल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
रत्नागिरी : प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पहिल्या टप्प्यात केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आज (बुधवार) अखेर दुसऱ्या टप्प्यातील एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. त्यामुळे दिवसभर अधिकारीवगळता सर्व कार्यालयांमध्ये सामसूम होती.
महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेने यापूर्वीही टप्प्याटप्प्याने आंदोलन केले होते. मात्र, २० आॅगस्ट २०१३ रोजी मागण्या तत्वत: मान्य झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. लेखी मागण्या मान्य होऊनही त्यांची पूर्तता न झाल्याने संघटनेने आता राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आज दुसऱ्या टप्प्यातील धरणे आंदोलन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आले. प्रांताधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महापुरूष मंदिरानजीक हे धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील वर्ग - ३ आणि ४ चे सुमारे २५० महसूल कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी यांना शासनाकडे सादर करण्यासाठी संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचीही शासनाने दखल न घेतल्यास येत्या १४ रोजी एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ आॅगस्टपासून संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे.
दरम्यान, आज महसूल कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग अधिकारीवगळता कर्मचाऱ्यांविना रिक्त झालेले दिसत होते.या आंदोलनाची नागरिकांनाही माहिती असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची गर्दी आज तुरळक होती. मात्र काही लोकांचा यामुळे खोळंबा झालेला दिसून येत होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार असूनही शुकशुकाट असल्याने अनेक कामे प्रलंबित राहिल्याचे दिसून येत आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, सर्व चतुर्थ कर्मचारी आणि चालक असे कर्मचारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)