मंडणगड नगरपंचायतीसाठी हालचाल
By Admin | Updated: January 10, 2015 00:12 IST2015-01-09T21:53:25+5:302015-01-10T00:12:06+5:30
प्रशासकीय हालचाली : सोयीसुविधांसाठी नागरिक विशेष आग्रही

मंडणगड नगरपंचायतीसाठी हालचाल
मंडणगड : मंडणगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.नगरपंचायतीच्या स्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचालीमुळे मंडणगडवासीयांना विकासासाठीच्या योजना अधिक प्रभावीपणे आणता येतील, असे मत व्यक्त होत आहे. आघाडी शासनाने मंडणगड नगरपंचायतीसाठी धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र, नगरपंचायत अस्तित्त्वात आणण्याबाबतची प्रक्रिया आता कधी होणार, असा प्रश्नही विचारला जात आहे. सुनियोजित विकास, प्रशासकीय कारभारातील शिस्त बदलत्या परिस्थितीत नव्या विकास प्रक्रियेला साथ दिली पाहिजे, असा प्रवाह या भागात असलेला पाहायला मिळत आहे.लांजा नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, १८ जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर पुढील काही काळात तेथे नगराध्यक्ष व नगरसेवक मंडळ तयार होईल. लांजा येथे नगरपंचायत अस्तित्त्वात आली. मग, मंडणगड येथे नगरपंचायत स्थापन करायला इतका उशीर का, असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतीकडून आवश्यक ते प्रस्ताव व नंतर महसूल यंत्रणेकडून होणारी अंमलबजावणी याबाबत काहिनी शंका व्यक्त केल्या आहेत. दप्तर दिरंगाई झाल्यास नगरपंचायत निर्माण होण्यास विलंब लागू शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत विश्वस्त मंडळाने नगरपंचायत होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मंडणगडमध्ये झालेल्या विशेष ग्रामसभेत अनेकांनी नगरपंचायत होण्याच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शासन दरबारी मंडणगड तालुक्याची ४२ टक्के डोंगरी तालुका अशी नोंद असल्यामुळे विकासासाठी निधी आणताना त्याचा फायदाही होणार आहे. शहरात असणाऱ्या विविध समस्यांबाबत अनेकवेळा नागरिकांनी तक्रारी केल्या. या समस्यांनी गेली दहा वर्षे विविध समस्यांनी प्रशासनाला भांडावून सोडले होते. कचरा, सांडपाण्यासारखे प्रश्न सोडवण्यात ग्रामपंचायतीची सर्व ताकद खर्ची पडू लागली आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी निधी व मनुष्यबळ खर्ची पडूनही समस्या कमी झालेल्या नाहीत. ग्रामपंचायतीचे विविध समस्यांवरील नियोजन अपुरे पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. नजीकच्या काळात येथे नगरपंचायत झाल्यास या साऱ्यात नक्कीच फरक पडणार आहे. नगरपंचायत केवळ मंडणगड ग्रामपंचायत हद्दीतील गावात राबविली जाणार आहे.
शहरीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा...
नगरपंचायत संकल्पनेच्या अंमलबजावणीनंतर पाणी व घरपट्टी करांत कमाल दहा टक्क्यांच्या वाढीची अपेक्षा आहे़ याखेरीज विद्यमान प्रभाग रचना व सदस्यसंख्येत वाढ अटळ आहे. नगरपंचायतीला दर्जाच्या आधारे निधी मिळतो. लोकसंख्या अथवा अन्य निकषांमुळे निधी कमी अथवा जास्त होत नाही. त्यामुळे शहर विकासाचा आराखडा तयार केल्यास कोट्यवधी रूपयांचा निधी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहर विकासाला उपलब्ध होणार आहे़ नागरिकांच्या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण, आरोग्य व माहिती संप्रेक्षणाच्या साधनांची परिपूर्तीही नगपंचायतीच्या माध्यमातून होणार आहे़ गावाचे शहरात रूपांतर, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह, आरोग्य सुविधांमध्ये वाढ होणार आहे. मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो. उद्याने, वाचनालये, व्यायामशाळा, रूग्णालय, सिनेमागृह आदी सुविधांमध्येही वाढ होणार आहे़
प्रतिक्रिया
नगरपंचायतीची आवश्यकता
मंडणगड येथे झालेल्या विशेष ग्रामसभेने आवाजी मतदानाने नगरपंचायत निर्माण होण्यासाठी होकार दिला. काहीवेळा विसंवादही निर्माण झाला. नगरपंचायत निर्माण होण्यासाठी आवश्यक असे निकष ग्रामपंचायत पूर्ण करु शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मंडणगड ग्रामपंचायतीचे दोनदा विभाजन झाल्याने उत्पन्न, क्षेत्रविस्तार यावर परिणाम झाला. आता फक्त कोंझर हे गाव ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असल्याने ग्रामपंचायतीमध्ये फारसा फायदा-तोटा नाही. तथापी शासन निर्णयाचा फायदा घेण्यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे़ एस. टी. स्टँड परिसरात व्यापार आहे़ टपरी मच्छी मार्केटपासून राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंतचे उद्योगांचे जाळे निर्माण झाले आहे़. या परिसरातील खोके व टपऱ्यांचे पुनर्वसन करायचे झाल्यास ते कोठे करायचे, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. ग्रामपंचायतीकडे स्वत:चा भुखंड नाही़ भुखंड टपरीधारकांना परवडेल की नाही, हे सांगता येणार नाही. नगरपंचायत निमिर्तीनंतरचे हे मुद्दे असल्याने आजच त्यावर गळा काढण्याचे कारण नाही. शहरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायत व्हावी.
- विजय भागवत, सामाजिक कार्यकर्ता़
नगरपंचायतीमुळे मंडणगड शहराचा विकास होईल. विविध माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर विकासासाठी करता येईल. रस्त्यांचे रुंदीकरण व अन्य सुविधांमुळे वाहतूक वाढेल. बाजारपेठ उपलब्ध होईल. मच्छी, फूल, भाजी मार्केट, स्पोटर्स, हेल्थ कल्ब, दूध संघ, सुविधांचा फायदा होईल. घनकचरा सांडपाण्याच्या व्यवस्थापनसाठी बायोगॅस प्रकल्प राबविता येतील. गावातील अंतर्गत रस्ते, गटारे चांगल्या प्रकारे राबविता येतील. दळणवळण वाढल्याने स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो. सेवा उद्योगांना चालना मिळू शकते़ त्यामुळे पर्यटन विकास होऊन जोडधंद्यांना हातभार लागेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान आपत्कालीन व्यवस्था अग्निशमन दल आरोग्यविषयक तत्परसेवा आणि अशा अनेक पध्दतीने मंडणगड नगरपंचायत तालुक्याचीही विकास करु. यासाठी मंडणगड येथे नगरपंचायत होणे गरजेचे आहे.
- दिनेश सापटे,
नागरिक व स्वयंसेवी संस्था
गेल्या दहा वर्षांत मंडणगड येथील शहरीकरणाचा वेग वाढला असून, त्या तुलनेत समस्या सातत्याने वाढत आहेत़ मंडणगड ग्रामपंचायतीची सर्व ताकद शहरीकरणाच्या समस्या सोडवण्यावरच होत आहे. त्यामुळे शासनाने मंडणगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचे घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. नगरपंचायतीमुळे सदस्यसंख्या प्रभाग व कर्मचाऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. सक्षम अधिकाऱ्यांची येथे प्रशासनात भरती होणार आहे. सद्यस्थितीत निधीअभावी ग्रामपंचायतीमधील सर्व विकासाची कामे ठप्प आहेत. दुसरीकडे तालुक्याच्या विकासावरच शहराचा विकास अवलंबून असल्याने तालुक्याच्या विकासाची नाळ शहर विकासाशी जोडली गेली आहे. त्यामुळे गैरसमजांना तिलांजली देऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. नगरपंचायतीच्या अंमलबजावणीनंतर काय होणार, याबाबत गैरसमज अधिक पसरवले जात आहेत.
- आदेश मर्चंडे, माजी सदस्य, ग्रामपंचायत, मंडणगड