वाढीव पदांच्या मंजुरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:00+5:302021-09-03T04:33:00+5:30
राजापूर : वाढीव पदांची माहिती अचूक व परिपूर्णरित्या शासनाकडे पाठवावी. शासनाने वाढीव पदांना वेतनासह त्वरित मंजुरी द्यावी, या मागण्यांसाठी ...

वाढीव पदांच्या मंजुरीसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदाेलन
राजापूर : वाढीव पदांची माहिती अचूक व परिपूर्णरित्या शासनाकडे पाठवावी. शासनाने वाढीव पदांना वेतनासह त्वरित मंजुरी द्यावी, या मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांवरील विनावेतन शिक्षकांनी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमाेर दि. २ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदावरील शिक्षक गेली १० ते १२ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य विनावेतन करीत आहेत. अलीकडेच स्वातंत्र्यदिनीही या शिक्षकांनी वाढीव पदांच्या मान्यतेसाठी आत्मक्लेश आंदोलन केले होते. यापूर्वीही अनेकदा मुंबई, पुणे तसेच विविध उपसंचालक कार्यालयासमोरही आंदोलने केली आहेत. परंतु, आजपर्यंत या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही. वारंवार माहिती मागविणे, प्राप्त माहितीमध्ये त्रुटी काढणे व मान्यता व वेतन न देणे या सगळ्या प्रकारामुळे विनावेतन काम करणारे शिक्षक मेटाकुटीस आले आहेत. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. परिणामी या वाढीव प्रस्तावित पदांच्या बाबतीत समस्त अन्यायग्रस्त शिक्षकांच्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही राज्यातील विनावेतन काम करणारे पीडित शिक्षकांनी आंदाेलन सुरू केले आहे.
या आंदोलनात राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून वाढीव पदांवरील शिक्षक उपस्थित राहिले आहेत. जर या आंदोलनात शासनाने सहकार्य केले नाही तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याची तारीखही ठरवली जाणार आहे. तिसरी लाट येवो अथवा चौथी लाट, न्याय हा मिळवणारच अशी प्रतिज्ञा शिक्षकांनी घेतली आहे. शासनाने त्वरित विनावेतन अध्यापनाचे कार्य करणाऱ्या पीडित शिक्षकांच्या वाढीव पदांना मान्यता देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.