धोकादायक घरातील कुटुंबांना हलवा
By Admin | Updated: June 25, 2015 01:08 IST2015-06-25T01:07:03+5:302015-06-25T01:08:00+5:30
पालकमंत्र्यांचे आदेश : पर्यायी घरांची व्यवस्था करून पुनर्वसन करा; दाभोळ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदतीच्या धनादेशाचे वाटप

धोकादायक घरातील कुटुंबांना हलवा
दापोली : तालुक्यातील दाभोळ टेमकरवाडी येथील इतर धोकादायक घरातील कुटुंबांचे स्थलांतर करून त्यांना तातडीने पर्यायी घरांची व्यवस्था करुन देण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे धनादेशही पालकमंत्र्यांच्याहस्ते देण्यात आले.
दाभोळ टेमकरवाडी येथील दरड कोसळलेल्या ठिकाणची पाहणी करुन वायकर यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि स्थलांतर व पर्यायी घरांच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस
अधीक्षक डॉ. संजय शिंदे, दापोलीचे उपविभागीय अधिकारी अनिल सावंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दाभोळ येथे झालेल्या दुर्घटना टाळण्याच्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धोकादायक जागांचा शोध घेऊन तेथील माती परीक्षण, नैसर्गिक परिस्थिती आदीचे सर्वेक्षण
करावे, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. या दुर्घटनेप्रसंगी बचाव कार्यात प्रशासनाला केलेल्या मदतीबद्दल स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांचे आभार मानून अशीच सतर्कता दाखवण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी त्यांना बचाव कार्याची माहिती दिली. आपद्ग्रस्तांना प्रशासनाकडून तत्काळ मदत करण्यात येत असून, आपद्ग्रस्त
कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना रेशनिंगसारख्या अत्यावश्यक
बाबींचा पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच धोकादायक कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करताना ग्रामस्थांची अडचण जाणून घेऊन पडताळणीअंती जागा देण्यात येईल,
असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांकडूनही मदत
दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या वारसांना वायकर यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच शासनाव्यतिरिक्त पालकमंत्र्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून घराचे पूर्णत: नुकसान झालेल्या ३ व्यक्तींना प्रत्येकी २५ हजाराचे, अंशत: नुकसान झालेल्या २ व्यक्तींना प्रत्येकी १० हजाराचे व जखमींना औषधोपचारासाठी प्रत्येकी ५ हजाराचे आर्थिक सहाय्य केले.