कारवलीत समस्यांचा डोंगर

By Admin | Updated: July 30, 2014 23:52 IST2014-07-30T23:51:35+5:302014-07-30T23:52:50+5:30

सुटता सुटेनात..: प्रशासकीय अनास्थेमुळे ग्रामस्थ बेहाल

Mountaineering problems | कारवलीत समस्यांचा डोंगर

कारवलीत समस्यांचा डोंगर

पाचल : समस्येच्या चक्रव्युहात अडकलेला कारवली गाव कधी समस्यामुक्त होणार का? असा प्रश्न कारवली गावच्या ग्रामस्थांना पडला आहे. व्यथा नेमक्या सांगायच्या कोणत्या, असाच प्रश्न ग्रामस्थांना पडल्याने चिंताग्रस्त ग्रामस्थ समस्यांच्या निवारणेची वाट पाहात आहेत.
कारवली गाव अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी वसलेला आहे. राजापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या गावाकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येते. गेल्या साडेतीन वर्षांत गावामध्ये कोणत्याही प्रकारचे काम होऊ शकले नाही. गावाची ७५ टक्के लोकसंख्या असलेल्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुख्य रस्ता डांबरीकरण असला तरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे नसल्याने बाजूचे पाणी रस्त्यावर येत आहे.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणाहून विठ्ठलवाडीला जोडणारा पदपूल आहे. मात्र, हा पूल धोकादायक असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, अशी त्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजीचे सूर उमटत आहेत.
सन १९९८ला राबवण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरील नळपाणी योजना आज डबघाईला आली आहे. संपूर्ण गावासाठी कार्यान्वित असताना या योजनेकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. डबघाईला आलेल्या या योजनेकडील दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. गावातील धनगरवाडीवर पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने पिढ्यानपिढ्या या वाडीतील ग्रामस्थ इतरांच्या खासगी जमिनीतून पायी प्रवास करत आहेत. बौद्धवाडीत जाणाऱ्या रस्त्याला डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध असूनसुद्धा विद्यमान सरपंचांनी प्रस्तावावर सह्या न केल्याने या रस्त्यावर फक्त खडीचे साम्राज्य दिसून येते. गावाच्या मध्यवर्ती भागातून जाणारी अर्जुन नदी गाळाने भरुन गेल्याने या नदीत पाणीसाठा होत नाही. गावाचा भौतिक विकास आराखडा नियोजित नसल्याने ग्रामपंचायतीचे कार्य नियोजनशून्य होत आहे.
नळपाणी योजनेच्या मुख्य पाइपलाइनपासून नजीकच असलेल्या लोकांनी नळजोडणी करण्याबाबत मागणी केलेली असताना ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या नळजोडणीपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. याकडे प्रशासकीय यंत्रणेने कानाडोळा केला आहे. दि. २४ जुलै रोजी येथील आमदार राजन साळवी यांनी गावाला भेट दिली. प्रत्यक्ष अतिमहत्त्वाच्या पदपुलावर जाऊन या पुलाची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना साळवी म्हणाले की, या पुलाच्या दुरुस्तीला आपणाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती रखडली आहे. अशा अनेक समस्यांमुळे कारवली गाव ग्रासला आहे. आगामी निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना याचा जाब विचारला जाईल, असे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Mountaineering problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.