मातेच्या कठोर परिश्रमांमुळे मुलांच्या आकांक्षांची गरूडझेप...!
By Admin | Updated: October 16, 2015 22:18 IST2015-10-16T21:57:32+5:302015-10-16T22:18:15+5:30
जयश्री बळकटे : पतीच्या निधनानंतर सांभाळला कुटुंबाचा डोलारा, मुलांच्या यशाला चढती कमान--नारीशक्तीला सलाम

मातेच्या कठोर परिश्रमांमुळे मुलांच्या आकांक्षांची गरूडझेप...!
शोभना कांबळे --रत्नागिरी-आयुष्याचा जोडीदार अचानक निघून गेला. एक चाकच निखळल्याने एकाकी झालेला संसाररथ सांभाळून पदरी असलेल्या तीन पिलांच्या डोक्यावर भरभक्कम छत देतानाच त्यांच्या उत्तुंग आकांक्षांच्या पूर्ततेसाठी जयश्री बळकटे गेली दहा वर्षे अथक परिश्रम करत आहेत.निवेंडी (ता. रत्नागिरी) हे जयश्री बळकटे यांचे सासर. पती जगन्नाथ बळकटे रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरूग्णालयात नोकरीला होते. मोठी ज्योत्स्ना, तिच्या पाठची जुई आणि धाकटा जयेश यांना घेऊन जयश्री बळकटे काही वर्षे गावीच होत्या. साधारणत: २००२ सालची गोष्ट जगन्नाथ बळकटे कामावर असतानाच एका रूग्णाने ते बेसावध असतानाच पाठून त्यांच्या डोक्यात काठी मारली. हा घाव इतका जबरदस्त होता की जगन्नाथ यांच्या मेंदूजवळील एका शिरेला मार लागला. तरीही बळकटे यांनी ही गोष्ट आपल्या घरच्यांना अगदी पत्नीलाही सांगितली नाही. कालांतराने त्याचा त्रास त्यांना अधूनमधून जाणवू लागला. त्यामुळे जयश्री बळकटे मुलांना घेऊन रत्नागिरीत आल्या. होणाऱ्या वेदना असह्य असल्याने बळकटे यांना पत्नीला याबाबत अखेर सांगावे लागले. शेवटी उपचार सुरू झाले. अगदी मुंबईच्या के. ई. एम. रूग्णालयातही सर्व त्या चाचण्या, शस्त्रक्रिया झाल्या. यात तीन वर्षाचा कालावधी कसाबसा गेला. यश आले नाहीच आणि २००५ साली जगन्नाथ बळकटे इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले.
त्यावेळी ज्योत्स्ना बारावीत, जुई नववीत आणि धाकटा जयेश सातवीत शिकत होते. अकालीच पती निधनामुळे जयश्री बळकटे यांच्यासमोर तर आकाशच फाटल्यासारखे झाले. त्यातच तीन मुलांना घेऊन संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा, हा यक्ष प्रश्न त्यांना सतावू लागला. पण काही दिवसच. त्यांनी स्वत:ला सावरले. आईपणाबरोबरच आता यापुढे कायमस्वरूपी आपणाला पित्याचीही जबाबदारी सांभाळावी लागणार आहे, या वास्तवाचे भान त्यांना आले. त्यासाठी कणखर होण्याचे त्यांनी ठरवले. पतीची पेन्शन जेमतेम १८०० रूपये. त्यांनी घरगुती कामे करण्यास सुरूवात केली.
मात्र, मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. मुलही हुशार होती. पित्याचे छत्र हरपल्याचे दु:ख असतानाच ज्योत्स्नाने नेटाने अभ्यास करत बारावीला ८८ टक्के गुण मिळवले. त्यानंतर डीएमएलटीचा कोर्स केला. त्यांनतर त्यापुढील एमएलटीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही काळ गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत नोकरी मिळाली. आईला थोडासा हातभार लागला. तरी दोन मुलांचे शिक्षण व्हायचे होते. ज्योत्स्नाच्या प्रयत्नामुळे तिला पुण्यातील एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली.
दुसरी जुईही हुशार आणि कष्टाळू होती. बारावी कॉमर्समध्ये तिनेही बहिणीचा वारसा जपत ८८ टक्के गुण मिळवले. पुढचे शिक्षण घ्यायचे ते आईवर सगळाच भार न टाकता स्वकष्टावर, असा निर्णय घेत तिने बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण खासगी नोकरी करून पूर्ण केले. एवढेच नव्हे तर स्वकष्टावर संगणक शास्त्रातील ‘बीसीए’ हा अभ्यासक्रमही पूर्ण केला. यासाठी ती १४ तास काम करत असल्याचे जयश्री बळकटे सांगतात. दहा वर्षाच्या सततच्या प्रयत्नाने अखेर गतवर्षी तिला वडिलांच्या जागेवर नोकरी मिळाली आहे.
जयेशही आपल्या दोन बहिणींप्रमाणे हुशार होताच. त्यानेही बारावीला चांगले गुण मिळवले. सीईटीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले. बी. एसस्सी.लाही तो महाराष्ट्रात प्रथम आला. सध्या तो मत्स्य महाविद्यालयात एम. एसस्सी. करतोय. मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्णत्वाला गेले असले तरी अजुनही जयश्री बळकटे यांचे कष्ट थांबलेले नाहीत.
पती जगन्नाथ यांचे निधन झाले तेव्हा जयश्री बळकटे यांना अवघी १८०० रूपये इतकीच पेन्शन सुरू झाली. एवढ्या कमी पैशात घर चालवतानाच मुलांची शिक्षणेही पूर्ण होणे गरजेचे होते. आपल्या मुलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जयश्री बळकटे यांनी मनावर दगड ठेवत लहानसहान कामे करण्यास सुरूवात केली. सध्या त्या एका खासगी रूग्णालयात रूग्णसेवा करत आहेत. रूग्णांसमोर येताना त्यांच्या चेहऱ्यावर आपण सोसलेल्या कष्टाचा कुठेही लवलेश नसतो. त्यांच्या नम्रपणामुळे रूग्णांनाही त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते.
ज्योत्स्ना हिने आपल्या तल्लख बुद्धीच्या सहाय्याने शिक्षणात यश खेचून आणले. एम. एल. टी. च्या परीक्षेत ती बोर्डात पहिली आली. मात्र, तिच्या ते गावीही नव्हते. येथील पॅथॉलॉजिस्ट डॉ. रवंींद्र श्रीखंडे यांनी तिचे घरी जाऊन अभिनंदन केले. त्यानंतर ती पुण्यात राष्ट्रीय प्रयोगशाळेत एका प्रकल्पाचे काम करत होती. नुकताच हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. गेल्याच वर्षी तिचे लग्न पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाशी झाले आहे. मात्र, तिचे लक्ष आपल्या कष्टकरी मातेकडे आणि भावंडांकडे सदैव लागून राहिलेले असते.
मुलांनी केले कष्टाचे सार्थक
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. वालावलकर आपल्याला बहीण मानतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे मुलांना शिक्षणात पुढे जाण्याची दिशा मिळाली. मुलांना सतत प्रेरणा मिळत गेली. अभ्यासात त्यांना प्रा. वालावलकर यांची खूपच मदत झाली. म्हणूनच आपली तीनही मुले आज इथपर्यंत पोहचू शकली, अशा भाषेत जयश्री बळकटे कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांची तीनही मुले एवढी हुशार असूनही प्रसिद्धीपासून सततच लांब राहिली आहेत. चाळीशी ओलांडण्याआधीच जयश्री बळकटे यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. कष्टाचे जीणे आले. मात्र, त्यांच्या तीनही मुलांनी आपल्या मातेच्या कष्टाचे सार्थक केले आहे.