गुहागरातील तळवली गावात माता बालस्नेही उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:32+5:302021-09-14T04:37:32+5:30

रत्नागिरी : समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे लहान मुले. तेव्हा बालविकासाच्या मुद्द्याला अग्रक्रम द्यायला हवा. गरोदर माता आणि लहान ...

Mother child friendly activities in Talwali village in Guhagar | गुहागरातील तळवली गावात माता बालस्नेही उपक्रम

गुहागरातील तळवली गावात माता बालस्नेही उपक्रम

रत्नागिरी : समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे लहान मुले. तेव्हा बालविकासाच्या मुद्द्याला अग्रक्रम द्यायला हवा. गरोदर माता आणि लहान मुलांना तातडीने उपचार मिळण्यासाठी मुंबईतील संपर्क संस्थेने माता बालस्नेहीची संकल्पना मांडली आहे. राज्यातील पहिल्या प्रकल्पाची सुरुवात गुहागरातील तळवली गावातून गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. तळवली ग्रामपंचायत येथे आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे.

आरोग्य यंत्रणेतील कमतरता दूर करण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, तर लोकसहभागातून गावा-गावातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली पाहिजे. जेणेकरून अधिक उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जायला लागू नये. विशेषतः गरोदर माता आणि लहान मुलांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी संपर्क संस्थेने माता बालस्नेही या प्रकल्पाची संकल्पना एप्रिलमध्ये मांडली होती. राज्यातील बहुतांश लोकप्रतिनिधींकडे याविषयी चर्चा करण्यात आली होती, पत्रही पाठविण्यात आले होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि संस्थेशी चर्चा केली. आरोग्य क्षेत्रातील एक उत्तम दर्जाचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करण्यासाठी जे काही करता येईल ते करू, असे त्यांनी बैठकीत सांगितले होते, त्याप्रमाणे याची मुहूर्तमेढ १६ सप्टेंबर रोजी रोवली जात आहे. संपर्क, युनिसेफ, प्रथम शैक्षणिक फाैंडेशन यांच्यामार्फत माता बालस्नेही प्रकल्पअंतर्गत तळवली गावातील अंगणवाडी, आशा सेविका, तरुणांना याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आल्यानंतर त्वरित डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. तसेच गरोदर मातांचे समुपदेशन, आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय करता येईल, आलेल्या रुग्णांना चांगली सेवा मिळतेय का? हे पाहण्यासाठी एक टीम याठिकाणी राहणार आहे. तसेच या आरोग्य केंद्रात लहान मुलांसाठी खेळणी व इतर साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम फाैंडेशनकडून २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येणार आहेत.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा देते, त्या प्रत्येक गावातील काही युवक-युवतींची निवड केली जाणार आहे. त्यांना आरोग्य आणि रुग्णसेवा याबरोबरच, बाळाच्या पहिल्या हजार दिवसांचे महत्त्व, कुपोषण, गरोदरपणात घ्यायची काळजी, स्तनपानाचे महत्त्व, मासिक पाळीच्या दिवसातील आरोग्य अशा मानवी जीवनचक्राशी निगडित विषयांवर संस्था प्रशिक्षण देणार आहे. त्यातून आरोग्यदूत मुला-मुलींची एक टीम तयार होईल. ही टीम प्राथमिक आरोग्य केंद्राला मदत करेल आणि गावातल्या गावातही सेवा देऊ शकेल. प्रशिक्षित मुला-मुलींना स्वकमाईचे एक साधनही मिळेल.

Web Title: Mother child friendly activities in Talwali village in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.