मोरेवाडीला पुन्हा धोका
By Admin | Updated: June 25, 2015 23:26 IST2015-06-25T23:26:39+5:302015-06-25T23:26:39+5:30
खेड तालुका : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाला हरताळ

मोरेवाडीला पुन्हा धोका
खेड : डोंगराळ भागात वसलेल्या नातूनगर गावातील मोरेवाडी येथे राहणाऱ्या १५ घरातील लोकांना नजीकचा डोंगर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी या घरांवर मोठमोठे दगड पडले होते. या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.
या घरांसाठी संरक्षण भिंत बांधावयाचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र आजतागायत या भिंतीचे काम करण्यात आले नाही. या घरांवर आता पुन्हा डोंगर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींसह आमदारही सुस्तावल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत खेड येथील प्रभारी तहसीलदार रवींद्र वाळके यांच्याशी संपर्क साधला असता संरक्षक भिंत बांधण्याचे काम दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्यक्ष हे काम सुरूच झाले नसल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा हा बनाव लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.
गेल्यावर्षी या घरांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत बांधून देण्याचे निश्चित केले होते. याबाबत खेडचे प्रभारी तहसिलदार रवींद्र वाळके यांनीही चार-पाच दिवसात ही भिंत बांधणार असल्याचे सुतोवाच केले होते. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतरही या भिंतीबाबत कोणीही बोलण्यास पुढे येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नातूनगर धरणामुळे या वाडीचे पुनर्वसन करून त्यांना डोंगराळ भागात घरे बांधण्यासाठी प्लॉट देण्यात
आले.
या ठिकाणी घरे बांधल्यानंतर प्रशासनाने त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. गेली दोन वर्षे सातत्याने तेथील ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, या सर्व मागण्या धुडकावण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या वाडीला लागूनच डोंगर असल्याने तेथील माती आणि दगड या घरांवर पडण्याची भीती ग्रामस्थांनी वर्तवली आहे. गेले ४ दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही मोठी दरड पडण्याची भीती व्यक्त होत आहे. ती कोसळण्याच्या अगोदरच तेथे तातडीने संरक्षक भिंतीचे काम सुरू करावे, अशी मागणी नातूनगर मोरेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)
कोणतीच कार्यवाही नाही...
खेड तालुक्यातील नातूनगर गावात असलेल्या मोरेवाडीतील १५ घरांना सध्या धोका आहे. गतवर्षी या घरांवर दगड कोसळले होते. असे असतानाही यंदा प्रशासनाने त्यांच्याबाबत कोणतीही काळजी घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण पावसाळा या वाडीतील कुटुंबांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा किती गांभीर्याने हाताळला आहे, याचे हे उदाहरण आहे. गेल्या नऊ महिन्यात यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.