महिलांच्या एकोप्यातून व्यवसायाची अधिक संधी--आधारवड
By Admin | Updated: January 8, 2016 01:05 IST2016-01-08T00:02:32+5:302016-01-08T01:05:12+5:30
कोंडगावातील पाच बचत गट एकत्र

महिलांच्या एकोप्यातून व्यवसायाची अधिक संधी--आधारवड
कोंडगावमधील पाच बचत गटांच्या महिलांनी एकत्र येऊन इतर महिलांसमोर एक आदर्श ठेवला आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी एकत्रित येताना शिक्षण नसूनही या महिलांच्या एकदिलीला दाद द्यायलाच हवी. या बचत गटांना नावे देतानाही या महिलांनी ती अतिशय विचारपूर्वक आणि कल्पकतेने दिली आहेत. त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे - ‘आपुलकी’ आणि ’स्नेह’ ठेऊन महिलांची ‘कीर्ती’ वाढवण्यास आम्ही ‘समर्थ’ आहोत. आता आम्ही एकमेकांच्या चांगल्या ‘मैत्रिणी’ झाल्या आहोत. कोंडगावसारख्या ग्रामीण भागातील सर्व वयोगटामधील महिलांचा असलेला हा एकोपा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
ग्रामीण महिलांना बचत गट चळवळीचे महत्व अतिशय चांगल्या पध्दतीने समजू-उमजू लागले आहे. त्यामुळे थोड्याशा मार्गदर्शनावरही त्यांनी गती घेतलेली दिसते. मुळातच या कष्टकरी महिलांना आर्थिकदृष्ट्या आपणही स्वत:च्या पायावर उभे राहायला हवे, हे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. त्यामुळे या महिला आता घराची चौकट ओलांडून विविध व्यवसाय संधी शोधू लागल्या आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथेही महिलांनी एकत्र येत बचत गट स्थापन केला. एक बचत गट तयार करणे, त्यात महिलांना विचाराने आणि कृतीने एकत्र आणणे हे अवघड काम असताना कोंडगाव येथील महिला धनश्री गांधी यांच्या प्रयत्नाने एकत्र आल्या. या सर्व महिलांच्या एकोप्यातून काम करता यावे, या उद्देशाने २००७ साली पाच बचत गट तयार झाले. यापैकी स्नेह महिला बचत गटामध्ये अध्यक्षा उषा सुवारे, सचिव सविता पांगळे, खजिनदार मनीषा दळवी, सदस्य रूपा सुवारे, सरस्वती मांडवकर, सुचिता सावंत, मालती सावंत, दीपाली शिंदे, भारती नारकर, मंगला गांधी, लक्ष्मी पांगळे यांचा समावेश आहे.
आपुलकी बचत गटामध्ये अध्यक्षा दीप्ती गांधी, सचिव रंजना धनावडे, खजिनदार सरिता डाफळे, सदस्य अलका सुवारे, विजया सुवारे, रूपाली दळवी, चंद्रभागा हतपले, लता सुवारे, सुमित्रा सुवारे, सुलोचना दळवी यांचा समावेश आहे. या बचत गटाला बँकेकडून प्रथम २५००० रूपये मिळाले. त्यानंतर दुसरे मुल्यांकन होऊन एक लाख रूपये मिळाले.
कीर्ती बचत गटामध्ये अध्यक्षा विद्या चव्हाण, सचिव सुगंधा लोटणकर, खजिनदार मानसी माने, सदस्य सरस्वती लोटणकर, रजनी चव्हाण, दीक्षा चव्हाण, दर्शना पांगळे, वंदना मोरे, सुनंदा सावंत, भामाई सावंत, रेश्मा सुवारे, सुगंधा सुवारे, सुरेखा दळवी, विशाखा सुवारे यांचा समावेश आहे.
समर्थ महिला बचत गटामध्ये अध्यक्षा धनश्री गांधी, सचिव दर्शना सावंत, खजिनदार प्रतिभा सुवारे सदस्य पार्वती पांगळे, सुवर्णा पांगळे, अर्चना सुवारे, तीर्था गांधी, विजया गांधी, सुशिला लाड, सुनंदा शेट्ये यांचा समावेश आहे.
मैत्रिण बचत गट हा नव्याने निर्माण झालेला बचत गट आहे. गटामध्ये अध्यक्षा निकिता गांधी, सचिव शिल्पा गांधी, खजिनदार अनुजा सावंत तर सदस्य मनिषा कोलते, विजया बेर्डे, ईश्वरी चव्हाण, अरूणा गांधी, मनिषा रामगडे, वर्षा सुवारे, विश्रांती गांधी, दिशा गांधी, रूपाली गांधी यांचा समावेश आहे.
या बचत गटाला जनता बँकेकडून ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य मिळाले. या बचत गटामार्फत कुळीथ, डांगर, पापड, फेण्या, आणि गरम मसाले आदी पदार्थ या महिला बनवतात. हे सर्व बचत गट एकत्रितपणे शालेय पोषण आहारही बनवतात. पोषण आहार देताना त्यातील दर्जेदारपणा कायम जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे आपुलकी, स्नेह, कीर्ती आणि समर्थ या चार बचत गटांनी आपला पहिलाच वर्धापनदिन एकत्र साजरा केला. इतरांनाही महिलांनाही यातून एकोप्याचा संदेश त्यांनी दिला. यावेळी महिलांनी एकत्र येत विचारांची देवाणघेवाण तर केलीच तसेच आपल्या कार्याची व्याप्ती विशद केली. वर्धापन दिनानिमित्त या सर्व बचत गटातील महिलांनी कोंडगाव वाणीवाडी येथील शाळेत निबंध, गायन, हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन केले. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली.
शहरातील सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या महिलांमध्ये काहीवेळा एकोपा कायम राखणे कठीण असते. मात्र, कोंडगावमधील या पाचही महिला बचत गटांतील अनेक सदस्या या अल्पशिक्षित आणि कष्टकरी आहेत. तरीही त्यांच्यातील एकोपा त्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. ५० रूपये मासिक बचतीवर या महिलांना बचत गटांतर्गत कर्जाचीही सुविधा उपलब्ध आहे. या महिला मासिक सभेलाही वेळेवर उपस्थित राहतात. गावात आयोजित अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांनाही त्या आवर्जुन उपस्थित असतात.
या महिलांचा गावातील विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये नेहेमीच उत्स्फूर्त सहभाग असतो. बचत गटाच्या माध्यमातून या महिला आता घराबाहेर पडू लागल्या आहेत. बचत गटामार्फत काही ना काही व्यवसाय करत असल्याने आपल्या हातात आता चार पैसे येऊ लागले आहेत, याचे समाधान त्यांना आहे. यासाठी त्यांना घरातील पुरूष मंडळींचेही अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळते, हे विशेष.
- शोभना कांबळे
या सर्व महिला अतिशय कष्टाळू आहेत. यातील काही महिला निरक्षरही आहेत. पण त्यांच्यात एकोपा जपण्याची चांगली वृत्ती आहे. या महिलांना बरोबर घेऊन काम करताना अतिशय आनंद होतो. एखादा कार्यक्रम ठरवला तर त्यात या सर्वच महिला आनंदाने सहभागी होेतात. आमच्या सर्व उपक्रमांना घरातील पुरूष मंडळींचा तसेच गावातील इतर मंडळींचाही चांगला पाठिंबा मिळतो.
- धनश्री गांधी, संस्थापक