कृषी पर्यटनावर अधिक भर

By Admin | Updated: October 4, 2014 23:55 IST2014-10-04T23:55:28+5:302014-10-04T23:55:28+5:30

विधानसभा निवडणूक : प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे जाहीरनामे प्रसिध्द

More on agriculture tourism | कृषी पर्यटनावर अधिक भर

कृषी पर्यटनावर अधिक भर

सुभाष कदम ल्ल चिपळूण
चिपळूण विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार यंत्रणा रंगात आली असून उमेदवारांनी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. जवळजवळ सर्वच प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यात कृषी पर्यटनावर अधिक भर देण्यात आला आहे.
चिपळूण विधानसभा मतदार संघात आता १० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, बहुजन समाजपक्ष, रिपब्लिकन सेना यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माधव गवळी, शिवसेनेचे उमेदवार आमदार सदांनद चव्हाण व रिपब्लिकन सेनेचे उमेदवार सुशांत जाधव हे उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत. पैकी राष्ट्रवादीचे निकम व भाजपाचे गवळी हे कृषी खात्याचे पदवीधर आहेत. आमदार चव्हाण हे अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत.
गवळी व निकम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यावर अधिक भर दिला आहे. कोकणात असलेल्या विपुल साधनसंपत्तीचा व नैसर्गिक वातावरणाचा पर्यटकांना आस्वाद घेता यावा. येथील पांरपारिक शेतीचा विकास व त्यातून होणारे पर्यटन शेतकऱ्याला पैसे मिळवून देतील यासाठी भाजपाचे माधव गवळी यांचे प्रयत्न आहेत. या भागात मगरींची संख्या वाढली आहे. यासाठी मगर संरक्षण प्रकल्प, ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संरक्षण, पुरातन मंदिरांचा विकास आदी बाबींवरही भाजपाचे गवळी यांनी भर दिला आहे. फळे व भाजीपाला प्रक्रिया महासंघाच्या विविध योजना कोकण रत्नभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी गावागावात पोहचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे गवळी यांची विकासाची दृष्टी शेतकऱ्यांना व मतदारांना आकृष्ट करणारी आहे.
राष्ट्रवादीचे शेखर निकम यांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम आहे. शिक्षणाबरोबरच कृषी व कला महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. भविष्यातही या मतदारसंघाचा विकास करण्याबाबत आपल्या संकल्पना त्यांनी जाहीरनाम्यात मांडल्या आहेत.
आमदार चव्हाण यांनी गेल्या ५ वर्षात केलेली विकासकामे, मतदार संघातील नव्याने करण्यात येणाऱ्या कामांवर प्रकाश टाकला आहे. परंतु, त्यांचा सारा भर आजही विकास कामांवर आहे. रिपब्लिकन सेनेच्या सुशांत जाधव यांनी बेरोजगारांना उद्योगधंदे करण्यासाठी वित्तीय सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, मुली, महिला व वयोवृद्धांसाठी सुरक्षा व जनकल्याणकारी योजना, पुरुष बचतगटांसाठी आर्थिक सबलीकरण, शेतकऱ्यांसाठी प्रतिमहा पेन्शन, सुशिक्षित बेरोजगारांना बेकारी भत्ता याशिवाय बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक याचा पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले आहे. काँग्रेसच्या रश्मी कदम यांनीही आघाडी सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांचा ऊहापोह आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व कृषी पर्यटनाचा विकास करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दहाही उमेदवारांनी कृषी पर्यटन, शेती विकास, भौतिक गरजा व ग्रामीण विकासावर भर दिला आहे.

 

Web Title: More on agriculture tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.