गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा कोकणला यंदा दोनशे जादा गाड्या
By Admin | Updated: August 24, 2014 00:41 IST2014-08-24T00:39:43+5:302014-08-24T00:41:33+5:30
रत्नागिरी विभागामध्ये येणार १४०० गाड्या

गणेशोत्सवासाठी गतवर्षीपेक्षा कोकणला यंदा दोनशे जादा गाड्या
रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने मुंबईकर बहुसंख्येने गावाकडे येतात. यावर्षी गणेशोत्सवाकरिता कोकणात १९०० जादा गाड्या येणार आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी २०० जादा गाड्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या येणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा भाविकांची संख्या जास्त असेल, या अंदाजाने गाड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. गतवर्षी मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या कोकणात आल्या होत्या.
यावर्षी १९०० जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. २४ आॅगस्टपासून या गाड्या येणार असून त्यासाठी महामंडळाने महामार्गावरती गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे.
दि. २४, २५, २६ व २७आॅगस्टपर्यंत जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. दररोजच्या १५० गाड्या वगळता १४०० गाड्यांचे नियोजन रत्नागिरी विभागासाठी करण्यात आले आहे तर ५०० गाड्या रायगड व सिंधुदुर्ग येथे येणार आहेत. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र गावापासून रेल्वेस्थानक दूर असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासनाने रेल्वेस्टेशनपासून बसस्थानकापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
महामार्गावर नियंत्रण कक्ष व चेकपोस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कशेडी व पोलादपूर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार असून चिपळूण, शिवाजीनगर व संगमेश्वर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. २४ आॅगस्टपासून कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात येणार आहे. त्याशिवाय आगारनिहाय पालक, अधिकारीदेखील नियुक्त करण्यात आले आहेत.
दि. २६ आॅगस्ट रोजी रत्नागिरीमध्ये ४०५ जादा गाड्या येणार असून २१४ ग्रुपबुकींगच्या आहेत तर १९१ आरक्षण केलेल्या आहेत. दि. २७ आॅगस्ट रोजी सर्वाधिक जादा गाड्या येणार आहेत. ११४२ जादा गाड्या असून ८७८ ग्रुप बुकींगच्या गाड्या आहेत तर २६४ आरक्षणाच्या गाड्या आहेत. दि. २८ आॅगस्ट रोजी २५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून १२५ ग्रुप बुकींग तर १३५ आरक्षणाच्या गाड्या येणार आहेत.
महामार्गावरती चालकांना मार्ग दाखविण्यासाठी कर्मचारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गावरील तीन ठिकाणी हे कर्मचारी पथक चालकांना दिशादर्शक ठरणार आहेत. गणेशोत्सवासाठी पुणे, कोल्हापूर येथून जादा गाड्या चालकांसहित मागविण्यात येत असल्यामुळे त्यांना कोकणातील मार्गांची दिशादर्शक करण्यात येते. महामंडळातर्फे मुंबईकरांना सुरक्षित गावापर्यंत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले असून फिरत्या पथकाद्वारे योग्य खबरदारी घेण्यात येणार असल्याचे विभागनियंत्रक के. व्ही. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)