संभाजी ब्रिगेडतर्फे विधानभवनावर मोर्चा

By Admin | Updated: December 5, 2014 23:35 IST2014-12-05T21:44:33+5:302014-12-05T23:35:48+5:30

विविध मागण्या : प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले यांची माहिती

Morcha on the Legislative Assembly by Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेडतर्फे विधानभवनावर मोर्चा

संभाजी ब्रिगेडतर्फे विधानभवनावर मोर्चा

चिपळूण : मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडतर्फे मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ८ रोजी विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले यांनी पत्रकारांना दिली.
मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय राज्यपालांचा अध्यादेश काढून राज्यात लागू केला होता. परंतु, या निर्णयावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती आली आहे. सर्वोच्च न्यायालयात न जाता राज्य शासनाने आरक्षणासाठी आवश्यक त्या त्रुटींची तत्काळ पूर्तता करुन अंतरिम स्थगिती रद्द करुन घ्यावी व अध्यादेश विधानसभेत पारित करुन घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आज महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी दुष्काळाने होरपळून निघाला आहे. तो अत्यंत दयनीय हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची गरज आहे, असे मनोज आखरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी औद्योगिक धोरणाच्या धर्तीवर स्वतंत्र कृती धोरण तयार करावे व ते अधिवेशनात मांडावे, मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा, ओबीसी जातनिहाय जनगणना करावी आदींसह विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या मोर्चामध्ये विभागीय कोकण संघटक प्रवीण कोलापटे, प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा संघटक सुबोध सावंत-देसाई, तालुकाध्यक्ष रोहन सुर्वे, खेड तालुकाध्यक्ष संतोष कदम, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विजय सावंत आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
राज्य विधानसभेचे अधिवेशन नागपूर येथे सुरू होत असून त्या पार्श्वभूमिवर मराठा सेवा संघाचा हा मोर्चा विराट होईल व त्याद्वारे सरकारवर दबाव आणला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. मोचार्ची तयारी राज्यात सर्वत्र करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Morcha on the Legislative Assembly by Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.