जिल्ह्यात सर्वत्र मोहरम शांततेत साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:11+5:302021-08-21T04:36:11+5:30
रत्नागिरी : मुस्लिम हिजरी नववर्षाला मोहरमपासून प्रारंभ होत असल्याने हिजरी १४४३ मोहरमला दि. ९ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. ...

जिल्ह्यात सर्वत्र मोहरम शांततेत साजरा
रत्नागिरी : मुस्लिम हिजरी नववर्षाला मोहरमपासून प्रारंभ होत असल्याने हिजरी १४४३ मोहरमला दि. ९ ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून दररोज रात्री इमामे हसन, हुसेन, कासम यांच्या बलिदानाच्या आख्यायिकेचे वाचन मुस्लिम मोहल्ल्यात सुरू होते. आख्यायिकेची समाप्ती गुरुवार दि. १९ रोजी रात्री झाली. शुक्रवार दि. २० रोजी सर्वत्र ‘यौमे-आशुरा’ पाळण्यात आला.
मोहरमपासून इस्लाम नववर्षास प्रारंभ होत असल्याने मोहरम महिन्याच्या चंद्रदर्शनापासून दररोज रात्री मुस्लिम मोहल्ल्यातून इमामे हसन, हुसेन, कासम यांच्या बलिदानाच्या आख्यायिकेचे (मजलीस) वाचन केले जाते. इमामे हसन, हुसेन, कासम यांचे प्रतीकात्मक पंजे सातव्या रात्री अर्थात सोमवारी (दि. १६) ठिकठिकाणी बसविण्यात आले होते. दहावी रात्र गुरुवारी असल्याने त्यादिवशी आख्यायिका वाचन समाप्ती करण्यात आली. दहाव्या दिवशी अर्थात शुक्रवारी यौमे आशुरा पाळण्यात आला. मुस्लिम बांधवांनी यौमे आशुरानिमित्त सलग दोन दिवस रोजे ठेवले होते. काही गावांतून कुराणपठण करण्यात आले.
गतवर्षीपासून कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार, आख्यायिकावाचनही प्रमुख एकाच व्यक्तीच्या माध्यमातून करण्यात आले. ताबूत मिरवणुकांना बंदी असल्याने मुस्लिम भाविकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करीत ताबूत व पंजे विसर्जन शांततेत व मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत केले.