जातपडताळणी कार्यालयावर मनसेचा मोर्चा
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:19:29+5:30
तब्बल सात महिन्यांनी रत्नागिरी कार्यालयात पाऊल ठेवणाऱ्या जातपडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागले.

जातपडताळणी कार्यालयावर मनसेचा मोर्चा
रत्नागिरी : तब्बल सात महिन्यांनी रत्नागिरी कार्यालयात पाऊल ठेवणाऱ्या जातपडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आठवडाभरात तर नोकरवर्गाचे प्रस्ताव महिनाअखेर निकाली काढून प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देऊन जातपडताळणी अधिकाऱ्यांनी आपली सुटका करुन घेतली.
रत्नागिरी आणि सिंधदुर्गसाठी जातपडताळणी समितीचे रत्नागिरीत समाजकल्याण कार्यालयाच्या आंबेडकर भवनात कार्यालय आहे. या कार्यालयाच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीबाबत आज मनसेच्या नेते कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली उपजिल्हाप्रमुख गोट्या जठार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष समीर झिमण, शहराध्यक्ष रुपेश सावंत, तालुकाध्यक्ष उमेश देसाई, विश्वास मुधोळे, नंदू साळवी, आनंद शिंदे, सुहास साळवी यावेळी उपस्थित होते. तब्बल सात महिन्यांनी आलेल्या उपायुक्त आर. जे. गोसावी यांनी आंदोलनाकडे कानाडोळा करत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ केला. यावेळी उपायुक्त गोसावी यांच्यासह समितीचे सदस्य सचिव नाईक हेदेखील असल्याचे पाहून कार्यालय सोडून इकडे का बसलात? तिकडे चला, अशी मागणी आंदोलकांनी केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी समजूत घातली व उपायुक्तांना कार्यालयात जाण्याची विनंती केली. आंदोलकांचा संताप पाहून ‘खळ्ळ - खट्याक’च्या भीतीने अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडण्याची तयारी केली होती. (प्रतिनिधी)