चिपळूण तालुक्यात ‘मनरेगा’चा धडाका
By Admin | Updated: November 12, 2015 00:03 IST2015-11-11T20:36:44+5:302015-11-12T00:03:56+5:30
लाखोंचा खर्च : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

चिपळूण तालुक्यात ‘मनरेगा’चा धडाका
अडरे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यात २८० कामे पूर्ण झाली असून, त्यात २ हजार ८४४ मजुरांनी काम केले आहे. या कामांसाठी एकूण ४९ लाख ६४ हजार ७३७ रुपये खर्च झाला आहे.
चिपळुणात मनरेगा योजनेअंतर्गत विविध कामांनी सध्या वेग घेतला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये या योजनेअंतर्गत कामे सुरु आहेत. कामासाठी लागणारा मजूरही आता उपलब्ध होऊ लागल्याने अनेक कामे पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येते. मात्र मजुरांना मिळणारी मजुरी ही अनियमित मिळत असल्याची ओरड सुरु आहे.
सन २०१५-१६च्या एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात विविध विकासकामे करण्यात आली. यामध्ये विहिरी ३३, गाळ काढणे १२, रस्ता करणे ७४, शौचालय बांधणे ३, संरक्षक भिंत ८, जनावरांचा गोठा १०७, शेळीपालन शेड ९, कुक्कुटपालन शेड १८, फळबाग लागवड १६ अशी एकूण २८० कामे झाली असून, त्यात २ हजार ८४४ मजुरांनी १५ हजार ३४२ दिवस काम केले आहे.
या विकासकामांवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना १ लाख ७३ हजार ३९६ इतके मानधन देण्यात आले. ग्रामीण भागातील बेरोजगारांना या योजनेमुळे रोजगार मिळत आहे. एप्रिल ते आॅक्टोबरअखेर मजुरीपोटी ३० लाख ३६ हजार २८५ रुपये खर्ची पडले आहेत, तर साहित्यापोटी १७ लाख ५५ हजार ५६ रुपये खर्ची पडले आहेत. शासनाच्या डीएससी सध्या बंद असल्यामुळे त्याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. वेळेवर डीएससी देऊन तालुक्यातील ग्रामस्थांना मजुरीचे व साहित्याचे पैसे लवकर उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी याप्रकरणी लक्ष घालावे आणि मजुरी वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
मजुरांची नाराजी
मजुरांना मजुरीबरोबरच त्यांनी या कामासाठी वापरलेल्या साहित्याचे पैसेही वेळेत उपलब्ध होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्हा : प्रतिसादात हळूहळू थंडावा
जिल्ह््याच्या अन्य भागातही कमी अधिक प्रमाणात या योजनेला मजूर उपलब्ध होतात. परंतु, त्यांची मजुरी शासनाकडून वेळेत उपलब्ध होत नसल्याने या योजनेला हळूहळू थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.