विकास निधीचा दुरुपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:49+5:302021-09-02T05:06:49+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी मिळणाऱ्या शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर ...

विकास निधीचा दुरुपयोग
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी मिळणाऱ्या शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याचा ठपका ग्रामस्थांनी ठेवला आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर चौकशी पूर्ण होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; परंतु देवरुख पंचायत समितीने अद्यापही अहवाल दिला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शैक्षणिक साहित्याचे वाटप
आवाशी : शहरातील अनेक भागांत गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने मोठी हानी झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. पूरबाधित भागातील गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल, एल.पी. इंग्लिश स्कूल आणि तळे विभाग सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले.
नळपाणी योजनेचे भूमिपूजन
गुहागर : तालुक्यातील काजुर्ली गावठाण बौद्धवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत पाण्याची टाकी बांधणे व नळपाणी पुरवठा योजना यासाठी निधी मंजूर झाला आहे. या नळपाणी योजनेचे भूमिपूजन गुहागरच्या सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते झाले.
आरक्षण केंद्र बंद
चिपळूण : महापुराच्या पाण्यात चिपळूण आगार पूर्णत: बुडाल्याने यंत्रसामुग्रीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नवीन यंत्रसामुग्री अद्याप आली नसल्याने आगारातील एसटी तिकीट आरक्षण केंद्र सध्या व्यवस्थापनाला बंद ठेवावे लागले आहे. त्यामुळे असंख्य प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
पुनर्वसनाची मागणी
सावर्डे : तालुक्यातील कोळकेवाडी धरणग्रस्त ग्रामस्थांनी गावठाण बोलाडवाडी, हसरेवाडी या ठिकाणी बांधलेली घरे २००५ च्या अतिवृष्टीत मोडकळीस आली आहेत. अनेक घरांना भेगा पडल्याने या घरांमध्ये राहणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे या ग्रामस्थांकडून नागावे, अलोरे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.