मिरजोळे-मधलीवाडीत भूस्खलन धोका वाढला
By Admin | Updated: July 16, 2015 00:30 IST2015-07-16T00:30:16+5:302015-07-16T00:30:16+5:30
शेतकरी चिंताग्रस्त : भेगांमधील दरी रुंदावली

मिरजोळे-मधलीवाडीत भूस्खलन धोका वाढला
रत्नागिरी : मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथे नदीने पात्र बदलल्याने गेल्या १५ वर्षांपासून भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे भूस्खलनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास गावातील विविध वाड्यांच्या शेतीला तसेच वाडकरवाडीतील घरांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिरजोळे - मधलीवाडी येथे १५ वर्षांपासून नदीने पात्र बदलले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी भूस्खलन होते. याबाबत येथील ग्रामस्थांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्याकडे माहिती दिली असता, त्यांनी स्वत: याबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. या घटनेला आता वर्ष उलटून गेले तरीही यावरील उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले गेले
आहे.
त्यानंतरही पुन्हा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांच्या आदेशावरून पत्तन विभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. मात्र, त्यांनी काय कारवाई केली, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या पाच - सहा वर्षांपासून केवळ पाहणी दौऱ्याशिवाय काही झालेले नाही. मात्र, ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने अद्याप कुठलीच उपाययोजना ठोसपणे राबवलेली नाही, असे मिरजोळे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मिरजोळे गावात दरवर्षी भूस्खलन होते. त्यामुळे या सर्व वाड्यांतील शेती वाया गेली असून, घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ गुरूनाथ भाटवडेकर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिले आहे. सध्या होत असलेली ही धूप फक्त पिचिंग करून थांबवता येण्यासारखी आहे. शेती तसेच घरांना भूस्खलनापासून असलेला धोका लक्षात घेऊन या भागात पिचिंग करण्याकरिता संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)