कोळोशीतील मिनी पाझर तलावामुळे ग्रामस्थांची पाण्याची वणवण थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:25+5:302021-08-23T04:33:25+5:30
शोभना कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणातील मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे कोकणात पाऊस तुडुंब झाला ...

कोळोशीतील मिनी पाझर तलावामुळे ग्रामस्थांची पाण्याची वणवण थांबली
शोभना कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणातील मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे कोकणात पाऊस तुडुंब झाला तरी ते पाणी वाहून जाते. त्यामुळे अनेक गावांना जानेवारी - फेब्रुवारीपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, काही गावांनी या समस्येवर मात करून गावांमध्ये पाझर तलाव, बंधारे बांधून पाणी अडवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळोशी (ता. कणकवली) या गावातील ग्रामस्थांच्या एकोप्यातून आणि नाम फाऊंडेशनच्या मदतीमुळे या गावाने उभारलेल्या पाझर तलावामुळे या गावची पाणीटंचाई दूर झाली, पण त्याचबरोबर आजुबाजूच्या स्रोतांमधील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे.
कोकणात पाऊस भरपूर पडतो, परंतु इथल्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. त्याचबरोबर डोंगर - दऱ्यांमुळे पाण्याचा प्रवाह एका जागी राहात नाही. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर पाण्याची सुबत्ता चार महिने राहते आणि त्यानंतर पाणीटंचाईचा सामना पुढे पाऊस पडेपर्यंत करावा लागतो. निसर्गाचे वरदान असलेल्या कोकणाची ही कायम समस्या आहे. कोळोशी गावालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या गावाचे प्रामुख्याने दोन भाग आहेत. वरच्या भागाला दरवर्षीच पाणीटंचाई सतावत असे. त्यामुळे या ग्रामस्थांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या जलसमृध्दीचे कार्य या ग्रामस्थांपर्यंत पोहोचले होते. या ग्रामस्थांनी नाम फाऊंडेशनशी संपर्क केला. या फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येत गावची समस्या सोडविण्याचा निर्धार केला. त्यासाठी मनमोहन कुलकर्णी, परमानंद सावंत यांच्या पुढाकाराने कोळोशी मिनी पाझर तलाव समितीही स्थापन करण्यात आली. यासाठी विश्वनाथ गावकर यांनी विनामोबदला जमीनही दिली. यासाठी आवश्यक असलेला निधीही उभा करण्याचे आव्हान होते, ते या ग्रामस्थांनी यशस्वीरित्या पेलले. ‘नाम’च्या सहकार्याने पोकलेन मशीन आणि त्यासाठी आवश्यक चालक देऊ करण्यात आला.
दि. १६ मार्च २०१७ रोजी कोकणातील या पहिल्याच प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. भूमिपूजनासाठी स्वत: नाना पाटेकर उपस्थित होते. या गावातील ग्रामस्थांबरोबर आजुबाजूच्या अनेक गावांमधील ग्रामस्थ सहकार्यासाठी पुढे आले. कोल्हापूरचे निवृत्त अधिकारी व इंजिनिअर वर्के तसेच साताराचे सर्जेराव पाटील यांचे तांत्रिकदृष्ट्या मोलाचे सहकार्य लाभले. पाझर तलावाशी संबंधित कामासाठी मार्गदर्शन करणारे नाम फाऊंडेशनचे खजिनदार राजीव सावंत आणि त्यांचे सहकारी राजामाऊ शिर्के, नामचे अभियंता गणेश थोरात आणि संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष साईटवर येऊन काम करण्यासाठी मार्गदर्शन करणारे कोकण समन्वयक समीर जानवलकर यांचे योगदान महत्त्वाचे होते.
----------------------------------
सुमारे सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नातून अखेर कोळोशीत मिनी पाझर तलाव व बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. मधल्या काळात पावसामुळे खंड पडला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा जोमाने काम पूर्ण करण्यात आले. या मिनी पाझर तलावामुळे कोळोशीतील आजूबाजूच्या पाण्याच्या स्रोतांमधील पाण्याच्या पातळीत चांगल्याप्रकारे वाढ झाली. त्यामुळे आता येथील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. या गावाला शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.