लाखोंचा अपहार, पुराव्याची जंत्री...

By Admin | Updated: December 31, 2015 00:36 IST2015-12-30T23:02:01+5:302015-12-31T00:36:27+5:30

नळपाणी योजना भ्रष्टाचार : मंडणगड तालुका प्रशासन अद्याप ढिम्मच

Millions of crores, proofs ... | लाखोंचा अपहार, पुराव्याची जंत्री...

लाखोंचा अपहार, पुराव्याची जंत्री...

देव्हारे : मंडणगड तालुक्यातील तुळशी ग्रामपंचायतीमार्फत आंबवणे खुर्द गावाला भारत निर्माण योजनेंतर्गत सन २००८ ते २०१० या कालावधीत नळपाणी योजना मंजूर झाली होती. मात्र, या नळपाणी योजनेमध्ये लाखो रूपयांचा अपहार झाल्याचा आरोप होत असून, माजी सरपंच रामचंद्र पारधी यांनी याबाबतचे पुरावे सादर करूनही प्रशासन ढिम्मच आहे.
मंडणगड तालुक्यात सध्या नळपाणी योजनेतील भ्रष्टाचाराचा विषय चांगलाच गाजत आहे. या विषयात कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुळशी ग्रामपंचायतीमार्फत आंबवणे खुर्द गावच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाने ३६ लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता.
या योजनेसाठी कमिटीही बनवण्यात आली होती. मात्र, या कमिटीवरील सदस्यांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कामाचा निधी काढण्याचे काम सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष यांनीच केले आहे. यामध्ये आयकर व विक्रीकरापोटी ६३ हजार ९४८ रुपये एवढे देणे असताना, २ लाख ६५ हजार एवढी रक्कम रोखीने काढली आहे. तसेच ४ लाख १० हजार रक्कमही रोखीने काढलेली आहे.
विद्युत कामासाठी एस्टीमेंटमधे ३० हजार रूपयांची तरतूद असताना, ९६ हजार ५४० एवढी रक्कम रोखीने काढण्यात आली असल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. कामासाठी देण्यात येणाऱ्या धनादेशांवरसुध्दा ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा सचिवांच्या खोट्या सह्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र स्वत: कमिटीच्या सचिवांनी करून दिले आहे. कमिटी सचिव हे या योजनेच्या मंजुरीपासून आजपर्यंत मुंबई येथे वास्तव्यास आहेत. बनावट सह्या करून कामाचा निधी काढण्यात आला आहे.
तुळशी सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत, भारत निर्माण योजनेंतर्गत झालेल्या या कामामध्ये लाखो रूपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे पारधी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या निधीबद्दल लेखा परिक्षण अहवालामधे सूचना व शेरे मारण्यात आले आहेत़ तुळशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पारधी यांनी ही बाब पुराव्यासह प्रथम मार्च २०१४मध्ये गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणूनही, संबंधित कामाची किंवा झालेल्या कथित आरोपांची कोणत्याही प्रकारे चौकशी करण्यात आलेली नाही़ त्यानंतर पारधी यांनी गटविकास अधिकारी यांना दोन स्मरणपत्रही दिली आहेत.़ मात्र, गटविकास अधिकारी या गैरव्यवहारकडे कानाडोळा करत असून, गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे.
या नळपाणी योजनेत गैरव्यवहार करणाऱ्यांना चपराक बसावी, त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी माजी सरपंच पारधी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)


तक्रार अर्ज : सरपंच, अध्यक्षच जबाबदार
कारवाई रखडलेलीच
तुळशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामचंद्र गंगाराम पारधी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे याबाबतचे पुरावे सादर करूनही, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या अपहारामध्ये तत्कालीन सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष हे जबाबदार असल्याचे पारधी यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे़


सभासदांना माहितीच नाही...
ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा कमिटी, सामाजिक लेखा परिक्षण कमिटी, महिला विकास कमिटी यावर असलेल्या सभासदांना कमिटीवर असल्याची कोणतीही कल्पना दिली नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

Web Title: Millions of crores, proofs ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.