लाखो नागरिक ‘जीवनदायी’विनाच
By Admin | Updated: June 6, 2014 00:18 IST2014-06-06T00:16:24+5:302014-06-06T00:18:08+5:30
रत्नागिरी जिल्हा : जीवघेण्या आजारावर मोफत उपचार मिळतायत कुठे?

लाखो नागरिक ‘जीवनदायी’विनाच
गुहागर : गोरगरिबांचा मेडिक्लेम म्हणून ओळख असलेली केंद्र शासनाची राजीव गांधी जीवनदायी योजना रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांपर्यंत अद्याप पोहोचलेलीच नाही. तब्बल ४ लाख ८ हजार कुटुंबांतील लोकांना जीवघेण्या आजारात विनामूल्य उपचार मिळू शकतात. मात्र जिल्ह्यात केवळ १ लाख १३ हजार लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
गरिबातील गरीब माणूस केवळ पैसे नाहीत म्हणून आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी केंद्र शासनाने ही महत्त्वाची योजना लागू केली आहे. कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड रोपण आदी शेकडो आजारांमध्येच या योजनेतून नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधा मिळू शकते. या आजारांमध्ये लाखो रुपये खर्च येतो. गोरगरिबांना तो परवडत नाही. त्यामुळे शासनाने सरसकट प्रीमियम भरुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील सर्वांना या योजनेद्वारे आरोग्य विमा संरक्षण दिले आहे.
या योजनेच्या रत्नागिरी व रायगड जिल्हा सहायक समन्वयक डॉ. प्रियांका कोंडे यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेस पात्र ४ लाख ८ हजार कुटूंब आहेत.
आतापर्यंत १ हजार ६३५ लाभार्थींवर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यासाठी ४ कोटी ६२ लाख ६२ हजार ६४४ रुपये खर्च आला. रत्नागिरी जिल्ह्यात ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून लागू झाली आहे.
रायगड जिल्ह्यात ही योजना २ जुलै २०१२ पासून लागू झाली आहे. येथे ५ लाख १९ हजार पात्र लाभार्थी कुटुंब असून, १२ हजार ३२७ लाभार्थ्यांवर आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी ३३ कोटी ८६ लाख ४७ हजार ७८९ रुपये खर्च आला. (प्रतिनिधी)