दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच का महागली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:23+5:302021-09-15T04:37:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर कायम आहे. यंदा कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी ...

दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच का महागली?
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर कायम आहे. यंदा कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याने गणेशोत्सवाचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे भक्त सध्या चैतन्यमय वातावरणात उत्सव साजरा करीत आहेत. या उत्सवाच्या अनुषंगाने मिठाईचे दर मात्र अधिकच वाढलेले दिसत आहेत. त्यामुळे गणेशभक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वच धर्मियांच्या सणांवेळी विविध प्रकारच्या मिठाईला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यातल्या त्यात खव्याच्या किंवा काजूच्या मिठाईला अधिक पसंती दिली जात असल्याने, या मिठाईचे किलोचे दर इतर मिठाईच्या तुलनेने अधिक असतात. वर्षभरात काही ना काही आनंदाच्या क्षणी औचित्य साधून मिठाईची खरेदी केली जात असली तरी, सणासाठी आवर्जून मिठाई घरी आणली जातेच. त्यामुळे सणांच्या कालावधीत मिठाईचे दर अधिक वाढलेले असतात.
गणेशोत्सवाच्या कालावधीतही विविध प्रकारचे पेढे, बर्फी, लाडू यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या काळात एकमेकांच्या घरी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाताना पेढे किंवा बर्फी आवर्जून नेली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरीही गोड नैवेद्य म्हणूनही विविध प्रकारची मिठाई ठेवली जात असल्याने या काळात मिठाईचे दर अधिक वाढलेले आहेत.
दरावर नियंत्रण काेणाचे?
पेढे, बर्फी यांचे दर प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या पद्धतीने लावले जात आहेत. हे दर आकारताना, आपण त्यात दर्जेदार, शुद्ध प्रकारचे तूप, तसेच अन्य पदार्थ टाकल्याचे कारण पुढे करीत, दुकानदारांकडून मिठाई वाढीव दराने विकली जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळीबाबत नियंत्रण ठेवले जात असले तरी, दराचे नियंत्रण कुठल्याच यंत्रणेकडे नाही.
का वाढले दर?
कोरोना काळात मिठाईची दुकाने कित्येक महिने बंद होती. त्यामुळे या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. काेरोना काळात महागाईने डोके वर काढले आहे. सध्या सर्वच पदार्थांचे दर वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी साखर आणि दुधाचे दरही वाढले होते. त्यातच आता दुधाच्या पदार्थांचेही दर वाढले असून वेलची, लवंग, केशर, काजू यांच्या दरात वाढ झाल्याने मिठाईचे दर वाढले आहेत.
- स्वीट मार्ट चालक, रत्नागिरी
महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. केशर, खवा, काजू तसेच इतरही विविध सुकामेवा यांचे दर वाढले आहेत. मिठाईत सुकामेवा अधिक लागतो. तसेच वेलची, लवंग यांसारखे पदार्थही महागले आहेत. मिठाईसाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे दर वाढल्यामुळे मिठाईच्या दरातही वाढ करावी लागली आहे. महागाईमुळे सणांच्यावेळी मिठाईचे दरही वाढतात.
- स्वीट मार्ट चालक, रत्नागिरी
भेसळीकडे लक्ष असूद्या
- विविध उत्सव, सण या काळात विविध प्रकारच्या मिठाईला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते.
- मागणी वाढली की अधिक पुरवठा करता यावा, तसेच त्यात अधिक नफा मिळावा, यासाठी मिठाईत भेसळ करण्याचा प्रयत्न होतो.
- मिठाईमध्ये आकर्षक दिसतील असे हानिकारक नकली रंग टाकणे, मिठाई खराब होऊ नये, यासाठी
ग्राहक म्हणतात...
प्रत्येकाच्या घरी सणावेळी किंवा चांगली किंवा आनंदाची घटना घडली तर पेढे, बर्फी आदी मिठाई घेऊन येतो. आता अगदी सामान्यातील सामान्यालाही आनंदाची घटना घडली तर मिठाई आणावीशी वाटते. मात्र, सध्या दर एवढे वाढले आहेत की, मिठाई आणताना विचार करावा लागतो.
- मनीष पवार, हातखंबा
महागाईने मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे. सध्या प्रत्येक पदार्थाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आता गणेशोत्सव सुरू आहे. प्रत्येकाच्या घरात हा उत्सव आनंदाने सुरू आहे. मात्र, महागाईच्या या काळात मिठाईचे दरही भरमसाट वाढले आहेत. निदान सणावेळी तरी हे दर कमी व्हायला हवेत.
- समृद्धी शेजवळ, रत्नागिरी