कामे होऊ नयेत म्हणून सभा उधळली : होमकळस
By Admin | Updated: May 27, 2016 00:23 IST2016-05-26T21:58:23+5:302016-05-27T00:23:06+5:30
एकीकडे सभा शास्त्राच्या नियमाप्रमाणे सभा चालू दे, असे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे आपणच सभेत गोंधळ घालायचा, ही भूमिका चुकीची आहे.

कामे होऊ नयेत म्हणून सभा उधळली : होमकळस
चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेच्या इतिहासात आम्ही म्हणू तसे सभागृह चालायला हवे, असा अट्टाहास करुन कर्मचाऱ्यांना धाकदपटशहा दाखवून विरोधक सभा उधळण्याचा प्रयत्न करतात हे अयोग्य आहे. एकीकडे सभा शास्त्राच्या नियमाप्रमाणे सभा चालू दे, असे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे आपणच सभेत गोंधळ घालायचा, ही भूमिका चुकीची आहे. गेल्या साडेचार वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली, तरीही काम केले नाही, अशी ओरड करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. आम्ही भ्रष्टाचार केला, असे कोणाचे म्हणणे असेल तर तो सिध्द करावा, त्यासाठी आम्ही तयार आहोत. पण जनतेची कामे होऊ नयेत, यासाठी विरोधकांचा हा अट्टाहास सुरु असल्याचे मत नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
चिपळूण नगरपरिषदेत नगराध्यक्षांच्या दालनात गुुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक राजेश कदम, बांधकाम सभापती शिल्पा सप्रे, आरोग्य सभापती आदिती देशपांडे, महिला व बालकल्याण सभापती रुक्सार अलवी, शिक्षण सभापती निर्मला चिंगळे, माजी बांधकाम सभापती बरकत वांगडे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रभागातील पूर्ण झालेल्या कामांवरील खर्चाचा तपशीलही दिला. यातील काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही कामे केली नाहीत तर ही कामे झाली कशी, असा प्रश्न नगराध्यक्षांनी उपस्थित केला.
सभेमध्ये विषयावर चर्चा करू देत नाहीत, असा आरोप विरोधक करतात. हा आरोप धादांत खोटा आहे. अर्धा ते पाऊण तासात कधीही मिटिंग संपलेली नाही. परंतु, विरोधक व इनायत मुकादम ज्या पद्धतीने सभेत गोंधळ घालतात त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा पीठासन अधिकारी म्हणून मला अधिकार आहे. परंतु, आपण एका सुसंस्कृत शहरात राहतो, जनतेचे विश्वस्त म्हणून आपण काम करत आहोत. त्यामुळे एखाद्याला बाहेर काढणे योग्य वाटत नाही. तरीही गोंधळ करणाऱ्या नगरसेवकाला आपण बाहेर जा, असे सांगून समजत नाही. शिपाई बाहेर काढायला लागला तर इतर सात नगरसेवक आडवे येतात व गोंधळ घालणाऱ्यांना साथ करतात. सभासदांनी आपल्या मर्यादा ओळखून वागले पाहिजे. सभागृहात पोलीस बोलावणे ही शोकांतिका आहे. चिपळूणच्या संस्कृतीला ते शोभनीय नाही. वेळ पडल्यास ठराव मताला टाकून मंजुरी घेतली जाईल, असेही नगराध्यक्षा म्हणाल्या. आम्ही महिला आहोत म्हणून आम्ही काम करत नाही, असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असे बांधकाम सभापती सप्रे म्हणाल्या. दि. ३ मे रोजी मंजुरी दिलेली सर्व कामे स्ट्रीट लाईटचा विषय वगळता बिलोमधली आहेत. स्ट्रीट लाईटचा विषय अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार अबाव्ह आहे. इनायत मुकादम खोटे बोलत असल्याचे कदम म्हणाले. (प्रतिनिधी)