आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:48+5:302021-08-21T04:36:48+5:30
रत्नागिरी : ओबीसी संघर्ष समितीच्या दोन बैठका शनिवार, दिनांक २१ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. खंडाळा - जयगड येथे ...

आज सभा
रत्नागिरी : ओबीसी संघर्ष समितीच्या दोन बैठका शनिवार, दिनांक २१ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. खंडाळा - जयगड येथे वाटद जिल्हा परिषद गटाची सभा सकाळी ११ वाजता तर शहरात जिल्हा रुग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे अन्य एक सभा सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
कोरोना चाचणी
रत्नागिरी : बोंड्ये नारशिंगे ग्रामपंचायतीतर्फे २३ ऑगस्ट रोजी पाचेगाव कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांची धडपड सुरु आहे. त्यासाठी नारशिंगे येथे आरटीपीसीआर चाचणी आयोजित केली आहे. जिल्हा परिषद शाळा, नारशिंगे येथे कोरोना तपासणी होणार असून, ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पूरग्रस्तांना मदत
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब तसेच मुंबई/ ठाणे ग्रामस्थांच्या जुगाई प्रतिष्ठान या संस्थेतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात आली आहे. मुरादपूर येथील २० कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार तर कोसुंब रेवाळेवाडी येथील चार कुटुंबांना प्रत्येकी ३ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप जाधव उपस्थित होते.
झाडी तोडण्याची मागणी
राजापूर : राजापूर आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या ओणी - अणुस्कुरा रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली असून, समोरुन येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने झाडी तोडण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे. शिवाय रस्त्यावर खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे.
पथदीपांचे उद्घाटन
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील हातीव गोठणे पुनर्वसन येथे पथदीपांचे उद्घाटन करण्यात आले. गोठणे येथे तीस कुटुंबांचे हातीव गावठाण येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावठाणमध्ये ग्रामपंचायत फंडातून २५ पथदीप बसवले आहेत. त्यांचे उद्घाटन सरपंच नंदकुमार कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
राकेश घोलम प्रथम
खेड : येथील तालुका युवा सेनेतर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सवणस येथील राकेश घोलम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक चंद्रशेखर आगरे (दापोली) तर तृतीय क्रमांक मंथन पाटणे (रत्नागिरी) यांनी मिळवला.
पावसकर यांची निवड
रत्नागिरी : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पदवीधर शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. लांजा आदर्श शाळा क्रमांक ५ मध्ये ते वरिष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
वांदरकर यांची निवड
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिऱ्या येथील मिऱ्या विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शांताराम तथा आप्पा वांदरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी मंत्री डॉ. बाळासाहेब सावंत यांनी मिऱ्या विविध सहकारी सोसायटीचे रोपटे लावले होते. आता या सोसायटीचा वटवृक्ष झाला आहे.