रुग्णकल्याण समितीची बैठक रद्द

By Admin | Updated: December 5, 2014 23:22 IST2014-12-05T22:36:20+5:302014-12-05T23:22:13+5:30

केंद्राचा मनमानी कारभार : फुरूस पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक

Meeting of the patient committee is canceled | रुग्णकल्याण समितीची बैठक रद्द

रुग्णकल्याण समितीची बैठक रद्द

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील फुरुस आरोग्य केंद्राच्या चाललेल्या मनमानी कारभारासंदर्भात आज (शुक्रवारी) रुग्ण कल्याण समितीची बैठक रुग्णकल्याण समितीच्या अध्यक्ष प्रज्ञा धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. पण अचानक ही बैठक रद्द करण्यात आली.
या बैठकीमध्ये रुग्णकल्याण समितीला येथील कुचकामी आरोग्य सेवेबाबत जाब विचारण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ जमले होते. परंतु, धनावडे या अचानक मुंबईला गेल्या असल्याचे दीपक शिर्के यांनी सांगून पुढील बैठक दि. १० रोजी होणार असल्याचे सांगितल्याने ग्रामस्थ शांत झाले. यावेळी फुरुसचे सरपंच सीताराम शिंदे, येगावचे उपसरपंच रोंगू भुवड, कोसबीचे उपसरपंच महिपत गांगरकर, दुर्गवाडीचे सरपंच आत्माराम सुर्वे, मुंढेचे सरपंच बारक्या चव्हाण, कोसबी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष के. डी. कदम, फुरुस तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण, दुर्गवाडीचे प्रभाकर गुरव, रुग्णकल्याण समितीचे सदस्य प्रकाश कदम, दीपक शिर्के, मंगेश सुर्वे, गोविंद गुजर, बारक्या सावंत, सुभाष सावंत, शांताराम कदम, शिवदास कदम, आत्माराम चव्हाण आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
फुरुस आरोग्य केंद्राअंतर्गत पंचक्रोशीतील १५ गावांना आरोग्य सेवा पुरविली जात आहे. सन २००९पासून या आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी टिकत नाही. दोन महिन्यांपूर्वी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सोनवणे हजर झाले असून, केंद्रात बाह्यरुग्ण संख्येतही वाढ झाली आहे.
स्टाफमधील काही कर्मचारी डॉ. सोनवणे यांच्याबाबत खोट्या तक्रारी करत आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. कार्यतत्पर अधिकाऱ्याविरुद्ध कटकारस्थान रचले जात आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रुग्णकल्याण समितीच्या अध्यक्ष धनावडे या आज उपस्थित राहणार होत्या. मात्र, ग्रामस्थांची बैठक रद्द झाली. याबद्दल जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ आरोग्य केंद्राकडे धडकले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता बुचडे यांच्याशी प्रतिनिधींनी संपर्क केला असता समिती अध्यक्ष धनावडे या अचानक मुंबईला गेल्याने सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
फुरुस आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दि. १० डिसेंबर रोजी रुग्णकल्याण समितीची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. बैठकीत योग्य निर्णय झाला नाही तर वेळ पडल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पंचक्रोशीतील संघर्ष समिती व ग्रामस्थांनी घेतला आहे. (वार्ताहर)

Web Title: Meeting of the patient committee is canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.