राजापूर नगराध्यक्षपदी मीना मालपेकर

By Admin | Updated: November 22, 2015 00:01 IST2015-11-21T23:26:14+5:302015-11-22T00:01:53+5:30

राष्ट्रवादीचा पराभव : चमत्कार घडवण्यात युतीला अपयश

Meena Malpekar as head of Rajapur city | राजापूर नगराध्यक्षपदी मीना मालपेकर

राजापूर नगराध्यक्षपदी मीना मालपेकर

राजापूर : शह काटशह, कुरघोड्या आणि फोडाफोडीच्या राजकारणावर मात देत काँग्रेस आघाडीच्या नगरसेविका मीना मालपेकर यांनी राजापूरचे नगराध्यक्षपद पटकावले. युती पुरस्कृत राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांचा त्यांनी सात विरुद्ध सहा मतांनी पराभव केला.
राजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात मतदान घेण्यात आले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेना-भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजापूरचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी काम पाहिले.
राजापूर नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आघाडीतर्फे मीना मालपेकर उभ्या होत्या. त्यांच्याविरुद्ध शिवसेना-भाजप युतीने मूळ राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या व काहीशा शिवसेनेकडे सरकलेल्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांनाच निवडणूक रिंगणात उतरवले.
राजापूर नगर परिषदेत एकूण १७ पैकी सर्वाधिक दहा नगरसेवक काँग्रेसचे असून, यापूर्वी त्यातील चौघांना न्यायालयीन प्रक्रियेतून मतदानाच्या हक्कापासून बाद ठरविण्यात आल्याने काँग्रेसचे सहा व मित्रपक्ष राष्ट्रवादीचा एक असे सात संख्याबळ आघाडीकडे होते, तर विरोधकांकडे युतीचे पाच व राष्ट्रवादीच्या नगरसेविका खडपे असे संख्याबळ सहा एवढे होते. फक्त एकाच मताचा फरक असल्याने चुरस वाढली होती.
गेले काही दिवस नवनवीन चर्चांना उधाण येत होते. आघाडीतील गळाला लागलेल्या नगरसेवकांच्या नावांची चर्चासुद्धा दबक्या आवाजात सुरू असल्याने प्रत्यक्ष सभागृहात काय घडणार, याबाबत केवळ राजापूर शहरच नाही तर जिल्ह्यात सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात राजापूरच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका व उमेदवार प्रतीक्षा खडपे यांच्या नावाची पुकारणी होताच स्वत: खडपे यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रतोद अभय मेळेकर, श्रद्धा धालवलकर, अपूर्वा मराठे, भाजपच्या शीतल पटेल व मराठे अशा सहाजणांनी आपला हात उंचावून मतदान केले. त्यानंतर आघाडीच्या उमेदवार मीना मालपेकर यांच्या नावाची घोषणा होताच स्वत: उमेदवार मालपेकर यांच्यासहीत उपनगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, स्नेहा कुवेस्कर, वैशाली मांजरेकर, मुमताज काझी, सुलतान ठाकूर व राष्ट्रवादीचे संजय ओगले अशा सातजणांनी आपला हात उंचावून मतदान केले व एका मताने काँग्रेस आघाडीच्या मीना मालपेकर राजापूरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.
या निर्णयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जवाहर चौकात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर मीना मालपेकर यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी तेथे विधान परिषद सदस्या अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीचे युवकचे राज्य उपाध्यक्ष अजित यशवंतराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार यासह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नूतन नगराध्यक्षा मीना मालपेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जवाहर चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नगराध्यक्षा मालपेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी आघाडीच्यावतीने फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Meena Malpekar as head of Rajapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.