विनयभंगाच्या चौकशीत वैद्यकीय अधिकारी दोषी
By Admin | Updated: August 7, 2015 23:35 IST2015-08-07T23:35:16+5:302015-08-07T23:35:16+5:30
खंडाळा आरोग्य केंद्र : लवकरच निलंबनाचा प्रस्ताव

विनयभंगाच्या चौकशीत वैद्यकीय अधिकारी दोषी
रत्नागिरी : खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पाटील यांनी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचे चौकशीअंती सिध्द झाले आहे. डॉ. पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव लवकरच आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील हे मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असताना त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. ते मद्य प्राशन करून ड्युटीवर येत असल्याने त्यांची अन्य ठिकाणी बदली करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे केली होती. सध्या खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. पाटील सेवा बजावत होते. डॉ. पाटील यांनी विनयभंग केल्याची तक्रार या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेने पोलीस स्थानकात केली होती. त्याचवेळी डॉ. पाटील यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी तेथील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनही केले होते. त्यानंतर पोलिसांनी डॉ. पाटील याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली होती.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत डॉ. पाटील यांनी केलेल्या कृत्याबद्दल सभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. डॉ. पाटील यांच्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय आरोग्य समितीत घेण्यात आला. डॉ. पाटील यांचा आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण यांच्यासह सदस्यांनी निषेध केला होता. त्याचवेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ. पाटील यांची डॉ. ठोंबरे यांनी चौकशी केली. या चौकशी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेतले. त्यामध्ये डॉ. पाटील यांनी विनयभंग केल्याचे चौकशीमध्ये पुढे आले. ते दोषी असल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाईचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने कार्यवाही सुरु केली असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराम घोगरे आणि फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश सोनवणे यांच्याबद्दल असलेल्या तक्रारीवरुन त्यांचीही चौकशी अजून सुरु आहे. (शहर वार्ताहर)
आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त
डॉ. पाटील यांच्या खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दारुच्या पार्ट्या चालत असल्याने तेथील हैराण झाले होते. तेथील दोन कर्मचारीही या पार्ट्यांमध्ये सहभागी होत असल्याचे पुढे आले होते. विनयभंग प्रकरणानंतर दारु प्रकरण पुढे आले. त्यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याच्या सूचना सभापती डॉ. शिगवण यांनी दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने त्यांची धावपळ उडाली आहे.