कोरोनामुळे छत्र हरपलेल्या २३ विद्यार्थ्यांना मायेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST2021-09-12T04:35:31+5:302021-09-12T04:35:31+5:30
लांजा : काेराेनामुळे काेणाची आई तर, काेणाचे वडील साेडून गेले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना मायेचा आधार देण्याची गरज आहे. ...

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या २३ विद्यार्थ्यांना मायेचा आधार
लांजा : काेराेनामुळे काेणाची आई तर, काेणाचे वडील साेडून गेले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना मायेचा आधार देण्याची गरज आहे. उमलत्या वयात त्यांना आधार देऊन उभे करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने सामाजिक बांधिलकीतून तालुक्यातील तब्बल २३ विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे.
कोरोनामुळे अनेक कुटुंबाने आपला आधार गमावला आहे. आजच्या या परिस्थितीमध्ये आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने तालुक्यातील माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती जमा केली. त्यामध्ये आई किंवा वडिलांचे छत्र हरपलेल्या तालुक्यातील २३ विद्यार्थ्यांची नावे निश्चित केली. त्यानंतर प्रत्येकी १००० रुपये राेख देऊन या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी प्रयत्न केले.
लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे लांजा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणपत शिर्के यांच्या हस्ते छोटेखानी स्वरूपात संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे ही रक्कम देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, सचिव दत्तात्रय देसाई, चारुदत्त उपाध्ये, लांजा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक रमाकांत सावंत, तळवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक खाेत, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
-----------------------------
पूरग्रस्तांनाही मदतीचा हातभार
या अगोदरही चिपळूण व खेड येथील पूरग्रस्त यांना वेगवेगळ्या संस्था, संघटना व व्यक्तीच्या माध्यमातून लांजा तालुका मुख्याध्यापक संघ तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यातर्फे लाखो रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाकडे चिपळूण व खेड येथील पूरग्रस्त यांना लांजा तालुका मुख्याध्यापक संघातर्फे रोख रुपये १० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.