Mathefiru kiyoyata kills eight people | माथेफिरूचा कोयत्याने आठजणांवर प्राणघातक हल्ला
माथेफिरूचा कोयत्याने आठजणांवर प्राणघातक हल्ला

लांजा : हातामध्ये कोयता घेऊन एका माथेफिरू तरुणाने आपल्या शेजाऱ्यांच्या चार घरांत घुसून समोर येईल त्यांच्यावर सपासप वार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी लांजा तालुक्यातील देवधे येथे घडला. यामध्ये ५ महिला, २ पुरुष, १ बालक असे आठजण जखमी झाले असून, त्यातील सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. इतक्या लोकांवर खुनी हल्ला केल्यानंतर हा माथेफिरू तरुण पोलीस स्थानकात स्वत:हून हजर झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्रमोद यशवंत गुरव (वय ३५) असे या माथेफिरूचे नाव आहे, तर अस्मिता संदीप गुरव (३४), भास्कर दत्तात्रय पाटकर (५३), शुभांगी भास्कर पाटकर (५०), वैशाली अशोक गुरव (५२), अक्षरा अशोक गुरव (२०), आयुश आशिष गुरव (५), आशिष अशोक गुरव, सुलोचना मारुती गुरव (६१) अशी हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवधे गुरववाडी येथील प्रमोद गुरव याने बुधवारी दुपारी १२.१५च्या सुमारास हातामध्ये कोयता घेऊन वाडीमध्ये फिरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. मात्र, तो एवढा आक्रमक होईल, याची पुसटशी कल्पना कोणालाच नव्हती. फिरत असतानाच त्याने शेजारी राहणाºया अस्मिता संदीप गुरव (३४) यांना शिवीगाळ करत त्यांच्या घरात (पान १२ वर)
शिरण्याचा प्रयत्न केला. त्याची ही अवस्था पाहून घरातील लोकांनी सर्व दरवाजे बंद करून घेतले. मात्र, दुपारी १२.३०च्या सुमारास त्याने अस्मिता गुरव यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दरवाजा फोडला. आत शिरताच त्याने अस्मिता यांच्या हातावर व मानेवर वार केला.
अस्मिता यांच्या सासूने आरडाओरडा केल्यानंतर प्रमोद तेथून बाहेर पडला आणि त्याने आपला मोर्चा भास्कर पाटकर यांच्या घराकडे वळविला आणि त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी भास्कर यांचा मुलगा गौरव व पत्नी शुभांगी सोडविण्यासाठी गेले असता प्रमोदने शुभांगी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये हे दापत्य गंभीर जखमी झाले आहे.
बेभान झालेला प्रमोद त्यानंतर वैशाली गुरव यांच्या घरात घुसला आणि त्याने वैशाली यांच्या मानेवर वार केला. वैशाली हिची नात अक्षरा गुरव हिने प्रमोदला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रमोदने तिच्याही डोक्यात व मानेवर वार केला. अर्धांगवायू आजाराने घरामध्ये असलेला आशिष अशोक गुरव यांच्यावर तसेच त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आयुश याच्यावर हल्ला केला. आशिषलाही किरकोळ दुखापत झाली आहे.
चौथ्या घरामध्ये प्रमोदने सुलोचना गुरव यांच्या मानेवर वार केला. त्याच्या वाटेत जे कोणी आले, त्यांच्यावर तो हल्ला करत होता. वाडीमध्ये मोठा आरडाओरडा झाल्यामुळे ग्रामस्थ गोळा झाले. मिळेल त्या गाडीने सर्व जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती वाºयासारखी पसरल्याने ग्रामस्थांनी व जखमींच्या नातेवाईकांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या ६ जणांना रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये किरकोळ जखमी झालेले आशिष गुरव व शुभांगी पाटकर यांच्यावर लांजा येथे उपचार सुरु आहे. हल्ला केल्यानंतर प्रमोदने स्वत:च लांजा पोलीस स्थानकात येऊन पोलिसांत हजर झाला. हे कृत्य आपणच केल्याचे त्यानेच पोलिसांना सांगितले.
-------------
प्रमोदला याआधीही झाली होती शिक्षा
प्रमोद हा व्यसनी असून, त्याने याआधीही खुनी हल्ला केला आहे. जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याला शिक्षाही झालेली आहे. शिक्षा भोगून दोन वर्षांपूर्वी तो देवधे येथे आला होता. त्याचे वागणे तिरसट व भांडखोर असल्याने वाडीतील ग्रामस्थ त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांपासून चार पावले दूर राहत असत. गेले दोन दिवस तो वाडीतील ग्रामस्थांना उद्देशून शिवीगाळ करत होता. मात्र, त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

सहा महिन्यांची
मुलगी बचावली
प्रमोद पहिल्या घरात घुसला आणि त्याने अस्मिता गुरव यांच्यावर वार केले. अस्मिता यांच्या सासू शैला गुरव यांनी आरडाओरडा केल्यामुळे प्रमोद त्या घरातून बाहेर पडला आणि दुसºया घरात गेला. त्यामुुळे शैला गुरव आणि अस्मिता यांची सहा महिन्यांची मुलगी बचावली.

Web Title: Mathefiru kiyoyata kills eight people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.